पुणे : साफसफाईनंतरचा गाळ, राडारोडा रस्त्यावर टाकल्यास कंत्राटदारांवर कारवाईचा इशारा

पावसाळापूर्व कामाअंतर्गत नाले, ओढे, चेंबर्ससह पावसाळी गटारे आणि पावसाळी वाहिन्यांची स्वच्छता केल्यानंतर गाळ आणि राडारोडा ठेकेदारांकडून रस्त्यावर तसाच ठेवण्यात येत असल्याचा प्रकार पुढे आला आहे. नागरिकांकडून त्याबाबत महापालिका प्रशासनाकडे मोठ्या प्रमाणावर तक्रारी करण्यात आल्याने महापालिका प्रशानसाकडून त्याची गंभीर दखल घेण्यात आली आहे. गाळ आणि राडारोड्याची शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट न लावल्यास कामाची देयके न देण्याचा निर्णय प्रशानसाने घेतला आहे.

अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमनार यांनी याबाबतचे आदेश काढले आहेत. गाळ उचलण्यात येत असल्याचे छायाचित्र आणि शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट लावण्यासाठी राडारोडा आणि गाळ अपेक्षित जागी नेल्याची नोंद ठेकेदारांकडून जीपीएस द्वारे घ्यावी, असे या आदेशात नमूद करण्यात आले आहे.

पावसाळ्यात पाण्याचा निचरा योग्य प्रकारे व्हावा, यासाठी पावसाळापूर्व कामे करण्याची प्रक्रिया यंदा लवकर सुरू करण्यात आली आहे. दरवर्षी पावसाळापूर्व कामाअंतर्गत शहरातील नाले, ओढे, कल्व्हर्ट, पावसाळी वाहिन्या आणि गटारांची स्वच्छता महापालिकेकडून केली जाते. त्यासाठी क्षेत्रीय स्तरावर निविदा मागविली जाते. पावसाळ्याच्या तोंडावर कामांनी वेग घेतला आहे.

मात्र चेंबर, पावसाळी वाहिन्या आणि गटारांची साफसफाई केल्यानंतर गाळ आणि अन्य राडारोडा रस्त्याच्या कडेला रचण्यात येत आहे. शहराच्या बहुतांश भागात असेच चित्र आहे. त्यामुळे नागरिकांकडून महापालिका प्रशासनाकडे तक्रार करण्यात आली होती. त्यामध्ये तथ्य आढळल्याने महापालिका प्रशासनाने हा आदेश काढला आहे. गाळ आणि राडारोड्याची विल्हेवाट कशी लावली, याची माहिती दिल्यानंतरच ठेकेदारांना काम केल्याबद्दलची रक्कम दिली जाणार आहे.

महापालिकेच्या जुन्या आणि नव्या हद्दीतील नाले आणि उपनाल्यांची एकूण लांबी ६४७ किलोमीटर एवढी आहे. त्यावर एकूण ७४२ कल्व्हर्ट आणि १२ बंधारे आहेत. त्यापैकी ९७ किलोमीटर लांबीचे नाले आणि २२१ कल्व्हर्टची सफाई झाल्याचा दावा महापालिका प्रशासननाकडून करण्यात आल आहे. शहरात एकूण ३२५ किलोमीटर लांबीच्या पावसाळी वाहिन्या आहेत. त्यावर ५५ हजार ३०० पाण्याचा निचरा होण्यासाठीचे आवश्यक चेंबर आहेत. त्यापैकी १०२ किलोमीटर लांबीच्या पावसाळी वाहिन्यांची तर २२ हजार ९५४ चेंबर्सची साफसफाई करण्यात आल्याची माहिती महापालिका प्रशासनाकडून देण्यात आली.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply