Pune Rain: खडकवासला 65 टक्क्यापर्यंत खाली करा, अजितदादांचा थेट अधिकाऱ्याला फोन

Pune Rain Update : मागील काही दिवसात पुण्याच्या धरणक्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस होत आहे. त्यामुळे धरणांमधील पाणीसाठ्यात सातत्याने वाढ होत आहे. दोन दिवसांपासून पुण्याला मुसळधार पावसाने झोडपले. आजही हवामान विभागाने पुण्याला अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. पुणे परिसरातील खडकवासला, मुळशी, पवना इत्यादी धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदीपात्रात होणार विसर्ग वाढवून सकाळी ११.०० वाजता ३५ हजार ००२ क्यूसेक करण्यात आला आहे. पण धरणक्षेत्रात सातत्याने पाऊस कोसळत असल्यामुळे धरणातील पाण्याची पातळी सातत्याने वाढत आहे. त्यामुळे पुणे दौऱ्यावर असलेल्या अजित पवारांनी खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाला फोन करत रात्रीपर्यंत धरण ६५ टक्क्यांपर्यंत खाली करण्याचे आदेश दिले आहे. अजित पवार यांनी कार्यकर्त्यांसोबत असताना अधिकाऱ्याला फोन करत सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या. पाण्याचा वाढता विसर्ग लक्षात घेवून नागरीकांना तशा सुचना द्याव्यात, तसेच नागरीकांना पाण्याच्या विसर्गाबद्दल माहिती व्हावी या अनुषंगाने विविध माध्यमातून माहिती देवून सतर्क राहण्याबाबत कळवण्याच्या सुचना यावेळी अजितदादांनी दिल्या..

Pune Rain : पुणे, बारामतीत तुफान पाऊस! वीर धरणातून ४७ हजार क्युसेकचा विसर्ग, नीरा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

नीरा नदीकाठच्या लोकांना पाटबंधारे विभागाचा सतर्कतेचा इशारा

नीरा नदीच्या खोऱ्यात होत असलेल्या दमदार पावसामुळे नीरा नदीवरील चारही धरणांमधून नीरा नदीत पाणी सोडलं जातंय. त्यामुळे नीरा नदी काठी पूरस्थिती निर्माण झालीय. नीरा नदी मध्ये वीर धरणांमधून पाणी सोडण्याच्या प्रमाणात मोठी वाढ करण्यात आलीय.

वीर धरणातून आता 47 हजार क्यूसेक्स वेगाने पाणी सोडण्यात येत आहे. वीर धरणामध्ये भाटघर धरणांमधून 22 हजार क्यूसेक्स तर नीरा देवघर धरणातून 7 हजार क्यूसेक्स आणि गुंजवणी धरणातून साडे तीन हजार असं 33 हजार 500 क्यूसेक्स पाणी सोडण्यात येत आहे. त्यामुळे वीर धरणातून नीरा नदी पात्रात मोठ्या प्रमाणात पाणी सोडलं जातंय.त्यामुळे पाठबंधारे विभागाने नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा दिलाय. नीरा नदीला सध्या पूरसदृश्य स्थिती निर्माण झालीय.

निवारास्थाने, कपडे, जेवण इत्यादी सर्व व्यवस्था करा - मुख्यमंत्र्यांच्या सूचना

नदी आणि धरण परिसरातील संभाव्य धोकादायक क्षेत्रातील नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात यावे. आवश्यकता वाटल्यास एनडीआरएफ, एसडीआरएफ आणि सेनादलाची मदत घेण्यात यावी. लोकांचे स्थलांतर केल्यास त्यांच्यासाठी निवारा, कपडे, जेवण इत्यादी सर्व व्यवस्था करण्यात यावी, अशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुणे महापालिका आयुक्त आणि पुणे जिल्हाधिकारी यांना दूरध्वनीद्वारे दिल्या आहेत.

पुणे परिसरातील खडकवासला, मुळशी, पवना इत्यादी धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. त्या पार्श्वभूमीवर या धरण आणि नदी परिसरातील पूररेषेच्या आतील आणि संभाव्य धोका क्षेत्रातील नागरिकांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्यात यावे. या विसर्गामुळे पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील बाधित होऊ शकणाऱ्या एकतानगर, दत्तवाडी, पाटील इस्टेट, येरवडा परिसर, शिवाजी नगर कोर्ट परिसर, कामगार पुतळा, हॅरीस ब्रीज, दापोडी, जुनी सांगवी, कासारवाडी, पिंपरी कॅम्प , रावेत, बालेवाडी गावठाण, ज्युपीटर हॉस्पिटल परिसर, कपिल मल्हार परिसर, बाणेर, बावधन, संगमवाडी इत्यादी सखल भागातील लोकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजना करण्यात याव्यात, अशा सूचना मुख्यमंत्री शिंदे यांनी दिल्या आहेत.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply