Pune : पुण्यात संचेती पुलावर जीवघेणं आंदोलन! तब्बल ३ तास रंगला ड्रामा; मोठी वाहतूक कोंडी...

Pune Protest On Bridge : पुणे शहरात झालेल्या एका शोले स्टाईल आंदोलनाची सध्या जोरदार चर्चा होत आहे. पुण्यातील मध्यवर्ती भागात असलेल्या संचेती रुग्णालयाच्या समोरील पुलावर एका तरुणाने शोले स्टाईलने आंदोलन केले. जुन्नरच्या तहसीलदारावर कारवाई करा, या मागणीसाठी त्याने पुलावर चढून घोषणाबाजी केली. यामुळे मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडीही झाल्याचे पाहायला मिळाले..

शोले स्टाईल आंदोलन..

याबाबत अधिक माहिती अशी की, पुण्याच्या संचेती रुग्णालयासमोरील पुलावर चढून एका तरुणाने शोले स्टाईल आंदोलन केले. महेंद्र देवकर असे या तरुणाचे नाव असून तो जुन्नर तालुक्यातील सुलतानपूरचा असल्याचे सांगण्यात येत आहे.. जुन्नर तालुक्याच्या तहसीलदारांवर कारवाई करावी, या मागणीसाठी तरुणाने हे आंदोलन छेडले होते. दुपारी चारच्या सुमारास झालेल्या या आंदोलनाने मोठी वाहतूक कोंडी झाल्याचे पाहायला मिळाले..

तहसीलदारावर कारवाईची मागणी..

वारंवार अर्ज देऊनही जमिनीच्या खातेदाराच्या नावाच्या नोंदी केली नाही असा आरोप करत देवकर याने तहसीलदारांविरोधात आंदोलन छेडले. यावेळी त्याने जोपर्यंत माझी मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत मी खाली उतरणार नाही. मी पुलावरुन उडी मारणार, असा पवित्रा घेतला.

तीन तास रंगला थरार...

दरम्यान, वाहतूक कोंडी झाल्याने पोलिसांनी तात्काळ आंदोलनस्थळी धाव घेतली. यावेळी पोलिसांनी त्याची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र तरुण ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. मागण्या मान्य झाल्याशिवाय मागे हटणार नाही, अशी भूमिका घेतल्याने पोलिसांचीही पंचाईत झाली. यावेळी अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी आले होते.

अखेर पोलिस प्रशासनाने दिलेल्या आश्वासनानंतर तरुणाने हे आंदोलन संपवले. ज्यानंतर खडकी पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. जवळपास तीन तास झालेल्या या आंदोलनाला बघ्यांनी मोठी गर्दी केली होती. 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply