Pan Card : पॅन कार्डच्या वैधतेसाठी उरले शेवटचे तीन दिवस

पुणे : आपल्याकडे पॅन कार्ड असेल तर, हे पॅन कार्ड आपल्या आधार क्रमांकाशी जोडणे अनिवार्य करण्यात आले आहे. यासाठी शेवटचे तीन दिवस उरले आहेत. या मुदतीत पॅन कार्ड हे आधार क्रमांकाशी जोडण्यात अपयशी ठरलेल्या नागरिकांचे पॅन कार्ड अवैध (रद्द) ठरणार आहे.

यामुळे पॅन कार्डच्या आधारे मिळालेल्या सर्व सेवा जसे बॅंक खाते बंद पडण्यासह अन्य सर्व खंडित होण्याचा धोका निर्माण झाला आहे. आपापल्या या सेवा पुर्ववत कायम ठेवण्यासाठी नागरिकांना येत्या ३१ मार्चपूर्वी आपापले पॅन कार्ड हे आधार क्रमांकाशी जोडावे (लिंक) लागणार आहे. यापुढे कोणत्याही परिस्थितीत मुदतवाढ मिळणार नसल्याचे प्राप्तीकर विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

पॅन कार्ड धारा क्रमांकाशी जोडण्यासाठी आता प्रत्येकी एक हजार रुपयांचे शुल्कसुद्धा मोजावे लागणार आहे. याबाबतची अंतिम मुदत, त्यासाठी आकारले जाणारे शुल्क आणि पॅन कार्ड हे आधार क्रमांकाशी कसे जोडावे, याबाबतची सविस्तर माहिती प्राप्तीकर विभागाच्या (इन्कम टॅक्स) www.incometax.gov.in या संकेतस्थळावर देण्यात आली आहे.

केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (सीबीडीटी) याबाबतचा निर्णय २०१७ मध्येच घेतला होता. या निर्णयानुसार हे कार्ड आधार क्रमांकाशी जोडण्यासाठी पहिल्यांदा ३१ मार्च २०२० ही अंतिम मुदत देण्यात आली होती. परंतु देशात मार्च २०२० पासून सुरु झालेल्या कोरोना संसर्गामुळे यासाठी दोन वर्षांची मुदतवाढ देऊन, याची अंतिम तारीख ही ३० मार्च २०२२ अशी निश्‍चित करण्यात आली होती.

या तारखेपर्यंत पॅन हे आधार क्रमांकाशी विनाशुल्क (मोफत) जोडले जात असे. मात्र ही दुसरी मुदतवाढ संपल्यानंतर तिसऱ्यांदा तीन महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली होती. परंतु या तिसऱ्या मुदतीत प्रत्येकी ५०० रुपये शुल्क आकारले जात असे. ही मुदत ३० जून २०२२ रोजी संपली आहे. त्यानंतर १ जूलै २०२२ पासून ३१ मार्च २०२३ पर्यंत शेवटची मुदतवाढ देण्यात आलेली आहे. या शेवटच्या मुदतवाढीत मात्र प्रत्येकी १ हजार रुपयांचे शुल्क आकारले जात आहे.

ऐंशी वर्षाच्या नागरिकांना सूट

दरम्यान, किमान ८० वर्षे किंवा त्याहून अधिक वय असलेल्या सर्व ज्येष्ठ नागरिकांना त्यांचे पॅन कार्ड हे आधार क्रमांकाशी जोडण्याची आवश्‍यकता नाही. या ज्येष्ठ नागरिकांना यामधून सूट देण्यात आलेली आहे. ज्येष्ठ नागरिकांबरोबरच अनिवासी भारतीय, भारतीय नागरिक नसलेले आणि आसाम, मेघालय व जम्मू-काश्मीरमधील नागरिकांना यामधून सूट देण्यात आलेली आहे.

पॅन कार्ड कसे लिंक करावे

आपले पॅन कार्ड आधार क्रमांकाशी जोडण्यासाठी पहिल्यांदा प्राप्तीकर विभागाच्या (इन्कम टॅक्स) www.incometax.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. हे संकेतस्थळ सुरु होताच, मुख्य पानावरच (होम पेज) ‘लिंक पॅन विथ आधार’ असे इंग्रजी भाषेत लिहिलेला पर्याय दिसेल. या पर्यायावर क्लिक करा.

हा पर्याय ओपन झाल्यानंतर ई-पे टॅक्स या दुसऱ्या पर्यायावर क्लिक करा. त्यानंतर या पर्यायाच्या माध्यमातून एक हजार रुपये शुल्क भरा. शुल्क भरल्याचे कन्फर्म झाल्यानंतर आपले पॅन कार्ड हे आधार क्रमांकाशी जोडण्याचा पर्याय उपलब्ध होईल. या पर्यायावर जाऊन हे दोन्ही क्रमांक जोडा. ते यशस्वीपणे जोडले गेल्यानंतर आपल्या मोबाईल क्रमांकावर ओटीपी (वन टाइम पासवर्ड) येईल. हा ओटीपी आवश्‍यक त्या रकान्यात भरा. त्यानंतर आपले पॅन आधार क्रमांकाशी जोडले जाईल. आपले पॅन यशस्वीपणे जोडल्याचा मेसेज आपल्या मोबाईल क्रमांकावर येईल.

जोडणीसाठी आवश्‍यक बाबी

- वैध पॅन कार्ड

- वैध आधार कार्ड

- मोबाईल नंबर

- वैध आधार क्रमांक

केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने पॅन कार्ड आधार क्रमांकाशी लिंक करण्यासाठी आतापर्यंत चार वेळा मुदतवाढ दिलेली आहे. आता शेवटची मुदतवाढ असून, ही मुदत येत्या ३१ मार्च रोजी संपत आहे. या मुदतीत एक हजार शुल्क भरून पॅन कार्ड हे आधार क्रमांकाशी जोडणे अनिवार्य केले आहे. या मुदतीत ते न जोडल्यास, येत्या १ एप्रिलपासून पॅन कार्ड रद्द होणार आहे. पर्यायाने या कार्डच्या आधारे उघडण्यात आलेले बॅंक खात्यातील व्यवहार ठप्प होण्याचा धोका आहे.

- अण्णासाहेब गिरीगोसावी,कर सल्लागार, येवलेवाडी



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply