Pune News : मिळकत करात ४० टक्के सवलतीचा अर्ज भरण्यासाठी ३० नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ

Pune News : मिळकतकराची गमावलेली ४० टक्क्यांची सवलत पुन्हा मिळविण्यासाठी ‘पीटी ३’ आज  (ता. १४) शेवटचा दिवस असल्याने क्षेत्रीय कार्यालयांमध्ये अर्ज भरण्यासाठी लांबच्या लांब रांगा लागल्या होत्या. अनेक नागरिक रांगेत थांबूनही त्यांना अर्ज दाखल करता आला नाही.

अखेर महापालिका प्रशासनाने नागरिकांचे नुकसान टाळण्यासाठी ‘पीटी ३’ अर्ज भरण्यासाठी ३० नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात गुरुवारी (ता. १६) लेखी आदेश काढण्यात येतील.

Maharashtra Weather : राज्यात थंडीचा कडाका वाढणार, अनेक जिल्ह्यांतील तापमानात घट; अवकाळीचं संकट टळणार?

राज्य सरकारने पुणेकरांना लागू असलेली १९७० पासूनची मिळकतकराची ४० टक्के सवलत काढून घेण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. पहिल्या टप्प्यात ज्या नागरिकांचे दोन फ्लॅट आहेत किंवा भाडेकरू ठेवले आहेत अशा ९७ हजार मिळकतींचा समावेश करून २०१९ ते २०२२ या तीन वर्षातील वसुली सुरु केली.

तसेच २०१९ पासून नव्याने नोंदणी झालेल्या मिळकतींची सवलत काढून घेतली आहे. त्यामुळे अव्वाच्या सव्वा बिल आल्याने नागरिकांचे धाबे दणाणले. यास प्रचंड विरोध झाल्याने अखेर राज्य सरकारने ४० टक्के सवलत पुन्हा देण्याचा निर्णय घेतला.

ही सवलत पुन्हा घेण्यासाठी सदनिकेचे पुरावे आणि पीटी ३ अर्ज भरून जवळच्या क्षेत्रीय कार्यालयात नेऊन देणे आवश्‍यक आहे. त्यासाठीची १४ नोव्हेंबर ही अंतिम उद्या संपणार असताना या दिवशी दिवाळी पाडव्याची सुट्टी असल्याने या दिवशी महापालिकेतर्फे अर्ज स्वीकारले जाणार की नाही याबाबत कोणतीही स्पष्टता देण्यात आलेली नव्हती.

जर अर्ज भरला नाही तर ४० टक्के सवलत गमविण्याच्या धास्तीने अनेक नागरिकांनी शहरातील क्षेत्रीय कार्यालयांमध्ये धाव घेतली होती. सकाळपासून ‘पीटी ३’ अर्ज भरण्यासाठी लांबच्या लांब रांगा लागलेल्या होत्या.

दुपारनंतरही रांगा कमी झाल्या नाहीत. अखेर चार नंतर क्षेत्रीय कार्यालयांनी नागरिकांना टोकन देऊन अर्ज भरण्यासाठी येण्यास सांगितले. दरम्यान, अर्ज भरण्यास मुदतवाढ द्यावी अशी मागणी अनेकांनी प्रशासनाकडे केली होती. अखेर महापालिका प्रशासनाने आज सायंकाळी ३० नोव्हेंबरपर्यंत अर्ज भरण्यास मुदतवाढ देण्यात आली असल्याचे स्पष्ट केले.

तर उपायुक्त अजित देशमुख म्हणाले, ‘‘आयुक्तांसोबत चर्चा करून पीटी ३’ अर्ज सादर करण्यास ३० नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भातील आदेश १६ नोव्हेंबर रोजी काढले जातील.’’

केवळ ७९ हजार अर्ज दाखल

मिळकतकराची ४० टक्के सवलत ही केवळ ज्यांची एक सदनिका आहे त्यांना मिळणार आहे. दुसऱ्या सदनिकेला १०० टक्के कर आकारणी केली जाईल. सध्या शहरातील जुन्या ९७ हजार ५०० आणि २०१९ नंतर नव्याने नोंदणी झालेल्या १ लाख ६५ हजार अशा एकूण २ लाख ६४ हजार ५०० मिळकतींना १०० टक्क कर लागू झाला आहे.

त्यांना सवलत मिळविण्यासाठी दोन पुराव्यांसह पीटी ३ अर्ज सादर करणे आवश्‍यक आहे. आत्तापर्यंत सुमारे ७८ हजार ९३८ जणांनी अर्ज भरले आहेत. अद्यापही १ लाख ८६ हजार ५६२ मिळकतधारकांनी अर्ज भरलेले नाहीत, अशी माहिती महापालिका प्रशासनाने दिली आहे. दरम्यान जे मिळतकधारक अर्ज भरणार नाहीत, त्यांना सवलत मिळणार नाही.

४० टक्के सवलतीसाठी हे पुरावे आवश्‍यक (कोणतेही दोन)

-‘पीटी ३’ अर्जासोबत मिळकतीचा वापर स्वतः राहण्यासाठी करत असल्याचे सोसायटीचे ना हरकत प्रमाणपत्र

- मतदान ओळखपत्र, पासपोर्ट, वाहनचालक परवाना, गॅस कार्ड, रेशनकार्ड आदी

- अर्ज सादर करताना त्यासोबत २५ रुपये चलन शुल्क

- पीटी ३ अर्ज महापालिकेच्या कार्यालयांसह propertytax.punecorporation.org या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply