Pune : लोहगाव विमानतळ; पुणे महापालिका जुलैपासून हाती घेणार पर्यायी रस्त्याचे काम

पुणे : लोहगाव विमानतळाच्या धावपट्टी वाढीसाठी येणारा सुमारे साडेतीनशे कोटी रुपये इतका खर्च हवाई दलाकडून करण्यात येणार आहे, तर लोहगावला जाणाऱ्या पर्यायी रस्त्याचे जुलै महिन्यापासून काम सुरू करण्यात येणार आहे. पर्यायी रस्त्याचे काम पूर्ण झाल्यानंतर सध्या वापरात येणारा रस्ता बंद केला जाणार आहे.

लोहगाव येथील विमानतळावरून आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरु करण्यासाठी वेगाने हालचाली सुरु झाल्या आहेत. त्यानुसार, आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरु करण्यासाठी आवश्‍यक धावपट्टी वाढविण्यासाठी हवाई दलाकडून प्रयत्न केले जात आहेत.

तर पर्यायी मार्गासाठी महापालिका व हवाई दलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सातत्याने बैठका, जागेची पाहणी, सर्वेक्षण यावर मोठ्या प्रमाणात काम सुरु आहे. गुरुवारी महापालिकेचे आयुक्त विक्रम कुमार व अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हवाई दलाच्या अधिकाऱ्यांबरोबर बैठक झाली होती.

तत्पूर्वी हवाई दलाच्या अधिकाऱ्यांनी गुरुवारी तेथे भेट देऊन प्रत्यक्ष जागेची पाहणी केली होती.
दरम्यान, शुक्रवारी पर्यायी रस्त्यासाठी महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी जागेचे सर्वेक्षण केले. त्यानुसार, पर्यायी रस्ता करण्याबाबतचा प्रस्ताव तयार करण्यात येणार असून तो संरक्षण मंत्रालयास पाठविला जाणार आहे.

संरक्षण मंत्रालयाकडून परवानगी मिळाल्यानंतर पर्यायी रस्त्याच्या कामाला जुलै महिन्यात सुरुवात करण्यात येणार आहे. तत्पूर्वी धावपट्टीची वाढ करण्यासाठी हवाई दलाला साडेतीनशे कोटी रुपये खर्च येणार आहे. धावपट्टीची लांबी वाढल्यास आंतरराष्ट्रीय विमाने उतरण्यास मदत होणार आहे. त्यामुळे महापालिका व हवाई दलाकडून विमानतळाची धावपट्टी वाढविण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.

विमानतळ धावपट्टी वाढीमुळे मोठी विमाने पुण्यात उतरू शकणार आहेत. वाढणाऱ्या धावपट्टीसाठीचा साडेतीनशे कोटी रुपयांचा खर्च हवाईदल करणार आहे. जुलै महिन्यापासून पर्यायी रस्त्याचे काम सुरु केले जाणार आहे.
- विक्रम कुमार, आयुक्त, पुणे महापालिका

पर्यायी रस्त्याची लांबी २० मीटर
विकफील्ड ते लोहगाव या रस्त्याला पर्यायी रस्ता करण्याचे काम महापालिका करणार आहे. सध्याच्या रस्त्यापेक्षा पर्यायी रस्ता मोठा असणार आहे. २० मीटर इतकी लांबी या रस्त्याची असणार आहे. त्यामुळे लोहगावकडे ये-जा करणाऱ्या नागरिकांची गैरसोय टळणार आहे.


मिसींग लिंक रोडचे काम २५ जूनपासून
विमाननगर ते विमानतळ या मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची वाहतूक कोंडीतून सुटका करण्यासाठी विमाननगर ते विमानतळाच्या एक्झिट गेट’कडील काही जमीन पर्यायी रस्त्यासाठी देण्यास संरक्षण दलाने मंजुरी दिली होती. त्यासाठी २२ गुंठे जमीनही मंजूर करण्यात आली आहे. त्याद्वारे ‘मिसींग लिंक रोड’ जोडला जाणार आहे. या १०० मीटर रस्त्याचे काम २५ जूनपासून सुरु केले जाणार आहे. हे काम १५ ते २० दिवसांत पूर्ण होणार असल्याचे विक्रम कुमार यांनी स्पष्ट केले



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply