Pune : दुचाकीस्वारांना कारने उडवले, एकाचा जागीच मृत्यू तर एकाची प्रकृती चिंताजनक; कारचा शोध सुरू

किरकटवाडी - खडकवासला धरण चौपाटी परिसरात पुणे-पानशेत रस्त्यावर पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास दुचाकीस्वारांना कारने समोरुन जोरदार धडक दिल्याने दुचाकीवरील एकाचा जागीच मृत्यू झाला आहे तर दुसऱ्या तरुणाची प्रकृती चिंताजनक असून त्याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

नितीन भाऊसाहेब मुसमाडे (वय 32, रा. नऱ्हे, ता. हवेली जि.पुणे) असे मयताचे नाव असून राम गणपत राठोड (वय 27, रा. प्रतापगड होस्टेल, काशीबाई नवले रुग्णालय, नऱ्हे, ता. हवेली.) हा गंभीर जखमी झाला आहे.

अपघाताचे प्रत्यक्षदर्शी असलेल्या खडकवासला धरण चौपाटी परिसरात रात्रीच्या वेळी सुरक्षारक्षक म्हणून काम करणाऱ्या तरुणांनी दिलेल्या माहितीनुसार पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास दुचाकी डोणजे बाजूकडून पुण्याच्या दिशेने जात होती. पुणे बाजूकडून भरधाव वेगाने आलेल्या इनोव्हा कारने दुचाकीला समोरुन जोरदार धडक दिली व सुमारे वीस ते तीस फूट दुचाकीला अक्षरशः फरफटत नेले. काही क्षणातच इनोव्हा चालक कारसह डोणजे बाजूकडे पसार झाला.

सुरक्षारक्षकांनी तातडीने याबाबत पोलीस नियंत्रण कक्षाला माहिती दिली. पोलीस निरीक्षक सचिन वांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली रात्र गस्तीवर असणारे पोलीस उपनिरीक्षक डी.पी. शिंदे व चालक महेंद्र चौधरी हे घटनास्थळी दाखल झाले.

रुग्णवाहिका आल्यानंतर गंभीर जखमी असलेल्या राम राठोड याला अगोदर जवळच्या खाजगी रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले व जागीच मृत्यू झालेल्या नितीन मुसमाडे याचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ससून रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.

याबाबत हवेली पोलीस ठाण्यात नोंद घेण्यात आली असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. तसेच सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करून संबंधित कारचा शोध घेण्यात येईल असे पोलीस हवालदार निलेश राणे यांच्याकडून सांगण्यात आले.

 


राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply