Pune : रिंगरोडचा मार्ग मोकळा, पुण्याची वाहतूक कोंडी फुटणार

पुणे: महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून (महाराष्ट्र स्टेट रोड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन – एमएसआरडीसी) प्रस्तावित केलेल्या वर्तुळाकार रस्त्याच्या फेरमूल्यांकनाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. नवीन फेरमूल्यांकनानुसार अनेक ठिकाणच्या जमिनींचे दर वाढले आहेत. त्यामुळे प्रकल्पबाधितांना नवीन दरानुसार मोबदला मिळणार असून प्रकल्पाच्या भूसंपादनाला लवकरच सुरुवात करण्यात येणार आहे.

जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवारी रस्ते महामंडळाच्या अधिकाऱ्यांची बैठक पार पडली. महामंडळाकडून प्राप्त झालेल्या फेरमूल्यांकनाचा अहवाल जिल्हाधिकारी यांच्याकडे सोपविण्यात आला. त्यानुसार तपासणी करून महसूल विभागांतर्गत पहिल्या टप्प्यातील मावळ आणि मुळशी तालुक्यातील २६ गावांतील प्रकल्पबाधितांसोबत निवाडा प्रक्रिया राबवून प्रत्यक्ष भूसंपादनाची प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.

पुणे, पिंपरी-चिंचवड शहरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी रस्ते महामंडळाने १७२ कि.मी. आणि ११० मीटर रुंदीचा वर्तुळाकार रस्ता प्रकल्प हाती घेतला आहे. पूर्व आणि पश्चिम अशा दोन टप्प्यात या रस्त्याचे काम करण्यात येणार असून पूर्वेकडून मावळातील ११, खेडमधील १२, हवेलीतील १५, पुरंदरमधील पाच आणि भोरमधील तीन गावांचा समावेश आहे, तर पश्चिम भागात भोरमधील पाच, हवेलीतील ११, मुळशीतील १५ आणि मावळमधील सहा गावांचा समावेश आहे. संपूर्ण प्रकल्पासाठी २६ हजार ८०० कोटींचा खर्च निश्चित करण्यात आला. त्यानुसार मूल्यांकन प्रक्रिया राबविण्यात आली. मात्र, मूल्यांकन करताना मागील तीन वर्षांतील खरेदी-विक्री व्यवहारांना अनुसरून घेण्यात आले होते. मधल्या काळात करोना प्रादुर्भाव असल्याने जमिनींचे खरेदी-विक्री व्यवहार झाले नसल्याने जमिनींचे दर कमी होत असल्याचा आक्षेप प्रकल्पबाधितांनी या मूल्यांकनाला घेतला होता. तसेच अनेकांनी जमिनी देण्यास नकार दिला. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने गेल्या पाच वर्षांतील खरेदी-विक्री व्यवहार लक्षात घेऊन फेरमूल्यांकन करण्याचे आदेश दिले होते.

पश्चिम भागातील सर्व गावांच्या फेरमूल्यांकनाची प्रक्रिया राबविण्यात आली. त्यामध्ये पहिल्या आणि आता केलेल्या मूल्यांकनात दरात फरक आढळून आला असून येथील जमिनींचे भाव वाढले आहेत. त्यामुळे प्रकल्पबाधितांना वाढीव मोबदला मिळणार आहे. -डॉ. राजेश देशमुख, जिल्हाधिकारी



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply