Pune News : येवलेवाडी टिळेकरनगर रस्त्यासाठी २२ कोटीची निविदा

पुणे : इस्कॉन मंदिराजवळून जाणाऱ्या टिळेकरनगर येवलेवाडी रस्त्याच्या कामासाठी निविदा प्रक्रिया सुरू झाली असून, २२ कोटी रुपये खर्च करून येते डांबरी रस्ता तयार केला जाणार आहे. पुढील आठवड्यात हा प्रस्ताव स्थायी समितीच्या मान्यतेसाठी येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. ‘सकाळ’ने हा रस्ता लवकर व्हावा यासाठी पाठपुरावा केला होता.

कात्रज-कोंढवा रोडवरील इस्कॉन चौकाजवळून येवलेवाडीकडे जाणाऱ्या रस्त्याचे गेल्या ८-१० वर्षापासून रखडले आहे. गेल्या वर्षी पावसाळ्यात काम सुरू केले पण अवघे २०० फूट लांबीचे काम झाले आणि पुन्हा हे काम पडले. त्यानंतर याचे काम पुन्हा हाती घेण्यात आले नाही. याचा त्रास टिळेकरनगर, कामठेनगर, पानसरेनगर आणि येवलेवाडी येथील नागरिकांना होत आहे.

महापालिकेची किंवा विधानसभेची निवडणूक आली की टिळेकरनगर येवलेवाडी रस्त्याचे काम लगेच केले जाईल असे आश्‍वासन या भागातील लोकप्रतिनिधी देतात. पण निवडणुकीनंतर त्यांना त्याचा विसर पडतो. मात्र या खराब रस्त्याचा परिणाम नागरिकांना भोगावा लागत असून, वारंवार अपघात होऊन अनेकजण जखमी झालेले आहेत.

दरम्यान, या रस्त्याचे होत नसल्याने नागरिकांनी तक्रार केल्यानंतर आयुक्त विक्रम कुमार यांनी सध्या किमान उपलब्ध असलेल्या रस्त्याचे काम पूर्ण केले जाईल, असे आश्वासन दिले होते. परंतु आयुक्तांचे हे आश्वासनही हवेत विरल्याने नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.

कात्रजकडून खडी मशिन चौकाकडे जाणाऱ्या रोडवर इस्कॉन मंदिर चौकाजवळून येवलेवाडीला जाणारा पूर्वीचा गाडीरस्ता आहे. यालाच येवलेवाडीचा जुना रस्ता म्हणून ओळखले जाते. हा गाडी रस्ता खडी मशिन चौकाकडून बोपदेव घाटाकडे जाणाऱ्या रस्त्याला समांतर असणारा आहे. मात्र खडी मशीन चौकाकडून पानसरेनगर, येवलेवाडीला येणे खूप गैरसोयीचे असल्याने येवलेवाडीच्या नागरिकांसाठी सोयीचा असणारा हा रस्ता आहे. सध्या या भागातील सर्वाधिक रहदारीचा हा रस्ता आहे, त्यामुळे याचे काम लवकर व्हावे अशी मागणी केली जात आहे.

‘‘टिळेकरनगर येवलेवाडी या दोन किलोमीटरच्या रस्त्यापैकी १४०० मीटरचा रस्ता २४ मीटर आहे. तर उर्वरित ६०० मीटर रस्ता १० मीटरचा आहे. येथे पूर्वी सिमेंट रस्ता केला जाणार होता, पण आता डांबराचा रस्ता केला जाणार आहे. यासाठी २२ कोटी रुपये खर्च येणार आहे. हा प्रस्ताव तयार होऊन तो मान्यतेसाठी गेला आहे. पुढील एक दोन आठवड्यात हा तो स्थायी समितीच्या मान्यतेसाठी येईल. तेथे मंजुरी मिळताच लगेच रस्त्याचे काम सुरू केले जाईल.’’

- व्ही. जी. कुलकर्णी, प्रमुख, पथ विभाग, महापालिका



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply