Pune-Mumbai Transport : पुणे-मुंबई प्रवास आता अधिक वेगवान; नवीन दोन लेन तयार होणार; आठ लेनवरून होणार वाहतूक

पुणे : पुणे-मुंबई प्रवास आता आणखी वेगवान होणार आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून (एमएसआरडीसी) द्रुतगती मार्गावरच्या दोन्ही बाजूंच्या प्रत्येकी एक लेन वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. तसा प्रस्तावदेखील तयार केला असून, तो अंतिम मंजुरीसाठी केंद्र सरकारकडे पाठविला आहे.

त्याला मंजुरी मिळताच अतिरिक्त लेन बांधण्यास सुरवात होईल. यासाठी सुमारे ५ हजार कोटींचा खर्च अपेक्षित असल्याचे ‘एमएसआरडीसी’च्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. दोन नवीन लेन तयार झाल्यानंतर वाहतूक कोंडी कमी होईल, शिवाय प्रवासदेखील वेगवान होणार आहे.
पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरून रोज सुमारे ६० ते ७० हजार वाहनांची वाहतूक होते.

शनिवारी व रविवारी या संख्येत वाढ होऊन ती ९० हजारांच्या घरात जाते. दिवसेंदिवस वाहनांची वाढती संख्या, अपघातांचे वाढते प्रमाण व निर्माण होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे या मार्गावरच्या प्रवासाला अडथळा येतो.

या अडचणी लक्षात घेता ‘एमएसआरडीसी’ने द्रुतगती मार्गावर दोन्ही बाजूंनी एक लेन वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. सद्यःस्थितीत या मार्गावर सहा लेन आहेत (तीन मुंबईच्या दिशेने, तर तीन पुण्याच्या दिशेने). आता यात प्रत्येकी एक लेनची वाढ होणार आहे. याचा मोठा फायदा वाहतुकीला होईल.

Pune News : भिमाशंकरच्या डोंगराला ३०० मीटर भेगा ; ८० कुटुंबांचा जीव धोक्यात !

नव्या लेनचा २१ वर्षांनंतर विचार
राज्यातील वेगवान शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई आणि पुण्याला जोडण्यासाठी २००२ मध्ये ९४ किलोमीटरचा द्रुतगती मार्ग तयार करण्यात आला. परिणामी प्रवाशांचा प्रवास गतीने होऊ लागला. ज्या वेळी हा मार्ग बांधण्यात आला, त्या वेळी वाहनांची संख्या कमी होती. आता मात्र त्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे दोन नवीन लेन वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला. २१ वर्षांनंतर हा विचार झाला.

नवीन १० बोगदे
द्रुतगती मार्गावर लेन वाढविताना अतिरिक्त जागेची आवश्यकता आहे. ‘एमएसआरडीसी’च्या ताब्यात काही जागा आहेत, तर आणखी काही गावांतील जागांचे संपादन करावे लागणार आहे. शिवाय या मार्गावर १० नवीन बोगदेदेखील बांधावे लागणार आहेत. सध्याच्या बोगद्यांचा विस्तार केला जाणार नाही.

- जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरही दोन लेन वाढविल्या जाणार
- अपघात प्रवण क्षेत्राच्या जागी उड्डाण पूल बांधणार
- ११ उड्डाण पूल बांधण्यात येतीत
- ‘आयटीएमएस’च्या कामालादेखील लवकरच सुरुवात



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply