Pune Koyata Gang : मैत्रिणीला भेटायला आला अन् फसला, कोयता गँगचा म्होरक्या पुणे पोलिसांच्या ताब्यात

Pune Koyata Gang : पुणे पोलिसांनी कोयता गँगच्या विरोधात मोठी कारवाई केली आहे. पोलिसांनी कोयता गँगचा म्होरक्या सचिन माने याच्यासह १४ साथीदारांना जेरबंद केले. आरोपींकडून कोयते, तलवार अशी घातक शस्त्रे जप्त केली आहेत. या सर्व आरोपींविरुद्ध संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक (मोका) कायद्यांतर्गत कारवाई केली आहे. आतापर्यंत कोयता गँगविरोधातील ही सर्वात मोठी कारवाई मानली जात आहे. 

सचिन परशुराम माने (वय २४) हा कोयता गँगचा म्होरक्या असून, त्याचे साथीदार विजय प्रमोद डिखळे (वय २२), अमर तानाजी जाधव (वय ३२), रमेश दशरथ मॅडम (वय २०), अजय प्रमोद डिखळे (वय २४), रोहित मधुकर जाधव (वय २७), यश किसन माने (वय २१), मोन्या ऊर्फ सूरज सतीश काकडे (वय २६, सर्व रा. औद्योगिक वसाहत, गुलटेकडी), निखिल राकेश पेटकर (वय २२) या आरोपींना अटक केली आहे.

सचिन माने हा घोरपडे पेठेतील त्याच्या मैत्रिणीला भेटण्यासाठी येणार असल्याची माहिती तपास पथकाला मिळाली. पोलिसांनी सापळा रचून पहाटे दोनच्या सुमारास त्याला ताब्यात घेतले. परंतु त्यावेळी झटापटीत माने याने कोयत्याने केलेल्या हल्ल्यात पोलिस कर्मचारी शिवा गायकवाड जखमी झाले.

कसबा विधानसभा पोटनिवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना सराईत गुन्हेगार सचिन माने आणि त्याच्या साथीदारांनी प्रतिस्पर्धी टोळीतील प्रकाश पवार आणि त्याच्या तीन साथीदारांवर कोयत्याने वार केले. त्यात पवार आणि अन्य तिघेजण गंभीर जखमी झाले होते.

स्वारगेट पोलिसांनी त्याचदिवशी चार आरोपींना अटक केली होती. परंतु, या टोळीचा म्होरक्या सचिन माने आणि त्याचे इतर साथीदार पसार झाले होते. माने याच्याविरुद्ध खून, खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी, खंडणी असे गंभीर गुन्हे दाखल आहेत.

स्वारगेट पोलिसांनी काढली धिंड

पुण्यातील गुलटेकडीच्या इंदीरानगर परिसरात कोयत्यासह धुमाकूळ घालणाऱ्या सचिन माने या कुख्यात गुंडाच्या टोळीची पोलिसांनी दहशत कमी करण्यासाठी स्वारगेट पोलिसांनी त्यांची रस्त्यातून धिंड काढली. सचिन माने आणि त्याच्या टोळीने गेल्या दहा दिवसांपूर्वी गुलटेकडी परिसरात दहशत माजवत नागरिकांवर कोयत्याने हल्ला केला होता.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply