Pune : राष्ट्रीय शैक्षणिक धोरण येत्या जूनपासून होणार लागू ; शिक्षण मंत्री दीपक केसरकर

पुणे : ‘बहुप्रतिक्षित असणारे नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण राज्यात येत्या जूनपासून लागू होणार आहे. या धोरणाची अंमलबजावणी जूनपासून सुरू होणाऱ्या नव्या शैक्षणिक वर्षापासून केली जाईल,’’ असा सूतोवाच शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी केला.

पुणे दौऱ्यावर असताना सोमवारी केसरकर यांनी ही माहिती दिली. दिवंगत खासदार गिरीश बापट यांच्या कुटुंबीयांची केसरकर यांनी भेट घेतली. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीबद्दल सांगितले. ते म्हणाले, ‘‘अभियांत्रिकी, तांत्रिक शिक्षण हे मराठीतून देण्यात येणार आहे. त्याप्रमाणे लवकरच वैद्यकीय शिक्षणही मराठीतून दिले जाणार आहे. मातृभाषेतून शिक्षण देणाऱ्या देशांमध्ये सर्वाधिक शास्त्रज्ञ आणि नोबेल पारितोषिक विजेते आहेत. आता भारतातही मातृभाषेतील शिक्षणाला विशेष महत्त्व दिले जाईल.’’

राज्यात अनेक ठिकाणी झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले, याबाबत केसरकर म्हणाले, ‘‘शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत झाली पाहिजे, ही भावना आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यात येतील. सॅटेलाईटद्वारे पंचनामे करण्याचा विषय कॅबिनेटमध्ये आला आहे. परंतु याविषयाबाबत राजकारण करणे योग्य नाही.’’

मुंबईवर हक्क सांगणाऱ्यांनी अडीच वर्षात काय केले

‘‘आज आम्ही भारतीय जनता पक्षासमवेत युतीत आहोत आणि आमचे चांगले संबंध आहे. मुंबईतील मराठी माणसाला न्याय द्यायचा आहे. शुद्ध हवा हा येथील प्राधान्यक्रमावरील विषय आहे. मुंबईवर हक्क सांगतात, त्यांनी अडीच वर्षात पर्यावरणावर काहीच काम केले नाही. त्यांनी केलेल्या चुका आम्ही सुधारत आहोत,’’

असे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले. ‘मुंबईचा महापौर कोण असेल’, या चर्चेबाबत ते म्हणाले,‘‘मैत्रीमध्ये पदाची चर्चा असता कामा नये. तर जनतेला काय द्यायचे हे महत्त्वाचे आहे. मुंबईला आंतरराष्ट्रीय शहर बनविण्याचा आमचा निर्धार आहे.’’



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply