Pune Crime News : ऑनलाइन टास्कच्या आमिषाने पोलिस कर्मचाऱ्याला पाच लाखांचा गंडा

पुणे  : ऑनलाइन टास्कच्या आमिषाने सायबर चोरट्यांनी पोलिस कर्मचाऱ्याची पाच लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी सायबर चोरट्यांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत एका पोलिस कर्मचाऱ्याने (रा. शिवाजीनगर पोलिस वसाहत) फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सायबर चोरट्यांनी या पोलिस कर्मचाऱ्याला मोबाईलवर टेलिग्रामद्वारे संदेश पाठविला होता. सोशल मीडियावर जाहिरातींना दर्शक पसंती मिळवण्याचे टास्क पूर्ण केल्यास चांगला परतावा मिळेल, असे आमिष दाखवले.

सायबर चोरट्यांनी पोलिस कर्मचाऱ्याचा विश्वास संपादन केला. पोलिस कर्मचाऱ्यास टास्क पूर्ण केल्यानंतर पहिल्यांदा परतावा दिला. त्यानंतर गुंतवणूक केल्यास आणखी चांगला परतावा देण्याचे आमिष दाखवले.

त्यानुसार या पोलिस कर्मचाऱ्याने वेळोवेळी चार लाख ९९ हजार रुपये ऑनलाइनद्वारे बॅंक खात्यात भरले. परंतु त्यानंतर सायबर चोरट्यांनी मोबाईल बंद करून ठेवला. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर या कर्मचाऱ्याने शिवाजीनगर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. पुढील तपास पोलिस निरीक्षक (गुन्हे) विक्रम गौड करीत आहेत.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply