Pune : शनिवार पेठेतून दुचाकी चोरणारा गजाआड, चोरट्याकडून दुचाकी चोरीसह घरफोडीचे गुन्हे उघड

Pune : शनिवार पेठेतून दुचाकी चोरुन पसार झालेल्या चोरट्याला विश्रामबाग पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून तीन दुचाकी, दोन दूरचित्रवाणी संच, मोबाइल, लॅपटाॅप असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. चोरट्याने विश्रामबाग, सिंहगड रस्ता पोलीस ठाणे, तसेच लोणावळा शहरात दुचाकी चोरी, तसेच घरफोडीचे गुन्हे केल्याचे तपासात उघडकीस आले.

मयूर अनंत डेेरे (वय ३५, रा. कसबा पेठ) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. डेरे हा सराइत चोरटा असून, गेल्या वर्षी ३० नोव्हेंबर रोजी त्याने शनिवार पेठेतून एक दुचाकी चोरली होती. या गुन्ह्याचा पोलिसांकडून तपास करण्यात येत होता. विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या तपास पथकातील पोलीस कर्मचारी मयूर भाेसले, आशिष खरात, सातप्पा पाटील यांना डेरे याने दुचाकी चोरीचा गुन्हा केल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने त्याला लोणावळा परिसरातून ताब्यात घेतले. चौकशीत त्याने विश्रामबाग, सिंहगड रस्ता पोलीस ठाणे, तसेच लोणावळा शहरातून गुन्हे केल्याची कबुली दिली. त्याच्याकडून तीन दुचाकी, दोन दूरचित्रवाणी संच, मोबाइल संच, लॅपटाॅप असा दोन लाख २३ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

Maharashtra Budget 2025 : संगमेश्वरमध्ये छत्रपती संभाजी महाराजांचं भव्य स्मारक उभारणार; अजित पवारांची अर्थसंकल्पात मोठी घोषणा

पोलीस उपायुक्त संदीपसिंग गिल, सहायक आयुक्त साईनाथ ठोंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयमाला पवार, गुन्हे शाखेचे निरीक्षक अरुण घोडके, उपनिरीक्षक मनोज बरुरे, अशोक माने, मयूर भोसले, सचिन कदम, गणेश काठे, आशिष खरात, मयूर भोसले, सातप्पा पाटील, अर्जुन थोरात, शिवा गायकवाड यांनी ही कारवाई केली. शहरातून दुचाकी चोरीला जाण्याच्या घटना वाढीस लागल्या आहेत. गेल्या वर्षी शहर, तसेच परिसरातून एक हजार ९८२ दुचाकी चोरीला गेल्या होत्या. दुचाकी चोरीला जाण्याच्या घटना विचारात घेतल्यास अशा प्रकारचे गुन्हे उघडकीस आणण्याचे प्रमाण कमी आहे.

शहरातून दररोज चार ते पाच दुचाकी चोरीला जातात. शहराच्या मध्यभागाच्या तुलनेत हडपसर, कात्रज, वानवडी, सिंहगड रस्ता, भारती विद्यापीठ परिसरातून दुचाकी चोरीला जाण्याचे प्रमाण वाढते आहे. दुचाकी चोरीचे गुन्हे रोखण्यासाठी ज्या भागातून दुचाकी चोरीला जाण्याचे प्रमाण जास्त आहे. अशा भागात गस्त घालण्याचे आदेश देण्यात आले आहे. दुचाकी चोरीची घटना घडल्यानंतर परिसरातील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासून चोरट्यांचा माग काढण्यात येतो. पुणे शहरातून चोरलेल्या दुचाकींची विक्री ग्रामीण भागात करण्यात येते, अशी माहिती पोलिसांनी दिली.

 


मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply