Pune Crime : बॅग तपासणीच्या नावाखाली प्रवाशांना लुबाडणारे सहा पोलिस निलंबित

Pune Railway Police : रेल्वे स्थानकात प्रवाशांचे साहित्य, पिशव्या तपासणीच्या नावाखाली गैरप्रकार करणाऱ्या लोहमार्ग पोलीस दलातील सहा कर्मचाऱ्यांना निलंबित करण्याचे आदेश लोहमार्ग पोलीस अधीक्षकांनी दिले आहेत. सहायक पोलीस फौजदार बाळू पाटोळे, हवालदार सुनील व्हटकर, प्रशांत डोईफोडे, जयंत रणदिवे, विशाल गोसावी, अमोल सोनवणे अशी निलंबत करण्यात आलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांची नावे आहेत. 

सहा पोलीस कर्मचारी पुणे रेल्वे स्थानकातील लोहमार्ग पोलीस ठाण्यात नियुक्तीस आहेत. 3 एप्रिल रोजी सहा पोलीस कर्मचाऱ्यांना घातपाती कारवायांच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांकडील साहित्य आणि पिशव्या तपासणीचे काम देण्यात आले होते. दुपारी पावणे एकच्या सुमारास रेल्वे स्थानकाच्या आवरात एका युवक आणि त्याच्या बरोबर असलेल्या मैत्रिणीला सहा पोलीस कर्मचाऱ्यांनी अडवून चौकशी सुरु केली. त्यांची चौकशी करुन त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. चौकशीत युवक आणि त्याच्या मैत्रिणीकडून पाच लाख रुपये घेण्यात आले. त्यानंतर त्यांना सोडून देण्यात आले, अशी माहिती मिळाली होती.

पुणे रेल्वे स्थानकावर घातपाती कारवायांच्या पार्श्वभूमीवर या कर्मचाऱ्यांकडे प्रवाशांचे साहित्य तपासण्याचे काम होते. त्यांनी तीन एप्रिल रोजी दुपारी एका तरुणासह त्याच्या मैत्रिणीला अडवले. त्यांच्या बॅगेत गांजा असल्याच्या संशयावरून त्यांची चौकशी केली. या दोघांना लोहमार्ग पोलिस ठाण्यातील वरिष्ठ निरीक्षकांसमोर हजर केले. त्याची स्टेशन डायरीत नोंद करून त्यांना सायंकाळी सोडून दिले.

दरम्यान, लोहमार्ग पोलिसांनी तरुण आणि त्याच्या मैत्रिणीकडून पाच लाख रुपये घेतले, अशी माहिती मुंबईच्या लोहमार्ग पोलिस महासंचालक कार्यालयातून लोहमार्ग पोलिस अधीक्षक राजेश बनसोडे यांना कळविण्यात आली.

बनसोडे यांनी या प्रकरणाची तातडीने चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश पोलिस निरीक्षक इरफान शेख यांना दिले. त्यानुसार रेल्वे फलाटावरील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासण्यात आले. चौकशीनंतर पोलिस अधीक्षक बनसोडे यांनी या सहा कर्मचाऱ्यांवर बेजबाबदार वर्तन केल्याचा ठपका ठेवत त्यांना निलंबित करण्याचे आदेश दिले. निलंबित कर्मचाऱ्यांपैकी एकावर यापूर्वीही प्रवाशांचे साहित्य तपासणीत गैरप्रकार केल्यामुळे जबरी चोरीचा गुन्हा दाखल होता. तरीही त्यांची पुन्हा रेल्वे स्थानकात नियुक्ती केल्याचे समोर आले आहे.

उडवाउडवीची उत्तरे

या प्रकाराची माहिती घेत असताना कोणी वरिष्ठ अधिकारी रजेवर आहे. तर, कोण प्रशिक्षणासाठी गेल्याचे समोर आले. पुणे लोहमार्ग पोलिस ठाण्यातील कर्मचाऱ्यांना त्यांचे वरिष्ठ अधिकारी कोण आहेत, निलंबित कर्मचाऱ्यांची नावे याबाबत विचारले असता उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली.

यापूर्वीही सात पोलिस बडतर्फ

या निलंबित कर्मचाऱ्यांकडे अनेक महिन्यांपासून प्रवाशांचे साहित्य तपासणीचे काम होते. त्यांना कोणाच्या सांगण्यावरून हे काम दिले गेले, हे अद्यापही गुलदस्तातच आहे. तसेच, विशेष म्हणजे जून २०२१ मध्ये अमली पदार्थ प्रकरणात गैरप्रकार केल्याप्रकरणी तत्कालीन वरिष्ठ निरीक्षकांसह सात पोलिसांना बडतर्फ केले होते. या घटनेवरून प्रवाशांना लुबाडण्याचे काम सुरूच असल्याचे समोर आले आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply