Pune Crime : दुचाकीवरून ताम्हिणी घाटात गेले, दारू पिण्यावरून वाद; तरुणाने सख्ख्या भावाची केली हत्या

Pune Crime : पुण्यामध्ये एका तरुणाने आपल्या सख्ख्या भावाची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ताम्हणी घाटात नेऊन तरुणाने भावाला संपवलं. धारधार शस्त्राने वार करत त्याची हत्या करण्यात आली त्यानंतर आरोपीने घटनास्थळावरून पळ काढला. भावाला दारूचे व्यसन होते यामुळे त्रस्त होत त्याने हे धक्कादायक कृत्य केल्याचे पोलिस तपासातून उघड झाले आहे. याप्रकरणी पुणे पोलिसांनी आरोपीला अटक केली.

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यात मोठ्या भावाने लहान भावाची हत्या केली. पुण्यातील कर्वेनगर परिसरात ही धक्कादायक घटना घडली. ३ दिवसांपूर्वी दोघे भाऊ एकाच दुचाकीवरून ताम्हिणी घाटाच्या दिशेने गेले होते. त्यावेळी वाटेत त्यांच्यात दारू पिण्यावरून वाद झाला. यावरून संतप्त झालेल्या अनिकेत शिर्केने छोटा भाऊ ऋषिकेश शिर्केवर धारधार शस्त्राने वार केले. हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या ऋषिकेशचा जागीच मृत्यू झाला.

 

त्यानंतर अनिकेतने ऋषिकेशचा मृतदेह ताम्हिणी घाटात गोनवडी येथे फेकला आणि पळून गेला. ताम्हिणी घाटात एका तरुणाचा मृतदेह आढळून आल्याचे कळताच पौड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी या मृत तरुणाची ओळख पटवण्याचे काम सुरू केले असताना धक्कादायक माहिती समोर आली. पोलिस तपासातून भावानेच भावाची हत्या केल्याची माहिती समोर आली. त्याआधारे कर्वेनगर आणि वारजे माळवाडी पोलिसांनी या प्रकरणाचा एकत्र तपास केला.

त्यानंतर पोलिसांनी कर्वेनगर भागातून अनिकेतला अटक केली. ऋषिकेश हा सतत दारू आणि नशा करायचा. त्यामुळे त्याचा मोठा भाऊ अनिकेत खूपच वैतागला होता. अखेर अनिकेतने या त्रासातून मुक्त होण्यासाठी भावाची हत्या केली. त्याने पोलिसांनी हत्येची कबुली दिली. सध्या या गुन्ह्याचा तपास पौड पोलिसांनी सुरू केला आहे. पौंड पोलिसांकडे आरोपीला देण्यात आले आहे. या घटनेमुळे पुण्यात खळबळ उडाली आहे.

 



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *