Pune Crime : मित्र-मैत्रिणींवर छाप पाडण्यासाठी प्रभाव पाडण्यासाठी तो बनला तोतया पोलिस'

पुणे : एखादा तरुण आपल्या मित्र- मैत्रीणींवर छाप पाडण्यासाठी महागडी दुचाकी वापरेल, दुसरा ब्रॅंडेड कपड्यांचा वापर करेल, किंवा मित्र-मैत्रीणींवर पैशांची उधळपट्टी करेल. पण एका तरुणाने आपल्या मित्र - मैत्रीणींवर छाप पाडण्यासाठी थेट पोलिस बनण्याचे नाटक केले. हा तोतया पोलिस गणवेश घालून रस्त्यावर थांबू लागला. मात्र गणवेशावर चप्पल घालण्याचा प्रकार पोलिसांच्या चाणाक्ष नजरेत आला आणि तोतया पोलिस खऱ्या पोलिसांच्या जाळ्यात अडकला !

यशवंत रमेश धुरी (वय 30, रा. नडे कॉलनी, तापकीरनगर, काळेवाडी, पिंपरी) असे अटक केलेल्या तोतया पोलिसाचे नाव आहे. याप्रकरणी पोलिस कर्मचारी श्रीकांत वाघवले यांनी चतु:शृंगी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिस उपनिरीक्षक निलेशकुमार महाडीक व तपास पथकातील पोलीस कर्मचारी औंध परिसरामध्ये गस्त घालत होते. त्यावेळी त्यांना राम नदीच्या पुलावर एक एक पोलिस कर्मचारी थांबल्याचे निदर्शनास आले.

पोलिसांना त्याचा संशय आल्याने त्यांनी त्यास हटकले. अनोळखी चेहरा वाटल्याने पोलिस कर्मचाऱ्यांनी त्याची चौकशी सुरु केली. कोणत्या पोलिस चौकीत नियुक्तीस आहे, अशी विचारणा पोलिसांना धुरी याच्याकडे केली. तेव्हा त्याने आपण औंध पोलिस चौकीत नियुक्तीस असल्याचे सांगितले. पोलिसांनी त्याची कसून चौकशी सुरु केली, त्याचवेळी पोलिसांची नजर त्याच्या पायाकडे गेली.

त्यावेळी त्याने पायात चप्पल घातल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. तर त्याच्या टोपीवर पिंपरी-चिंचवड पोलिस असा उल्लेख आढळला. धुरी खोटे बोलत असल्याचे लक्षात येताच पोलिसांनी त्यास ताब्यात घेऊन अधिक चौकशी केली. तेव्हा त्याने तो डिलिव्हरी बॉय म्हणून काम करत असल्याची कबुली दिली. तसेच मित्र-मैत्रिणींवर छाप पाडण्यासाठी त्याने पोलिसांचा गणवेश परिधान केल्याचे सांगितले.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply