Pune Crime : रस्ता चुकल्याने कंटेनरचालकाने केला मित्राचा खून

पुणे - रस्ता चुकल्याच्या कारणावरून एकाच कंटेनरवरील दोन चालकांमध्ये झालेल्या वादात एकाने दुसऱ्या चालक मित्राचा लोखंडी रॉडने डोक्यात वार करुन खून केला. तुळापूर ते लोणीकंद रस्त्यावरील एका हॉटेलसमोर २६ जानेवारी रोजी सायंकाळी हा प्रकार घडला. लोणीकंद पोलिसांनी कंटेनरचालकाला अटक केली आहे.

शहजाद अब्दुल कयुम अहमद (वय २६, रा. पोखर भिटवा, जि. बस्ती, उत्तर प्रदेश) असे खून झालेल्या चालकाचे नाव आहे. तर, शमशुल अलीअहमद खान (वय २६, रा. चायकला, जि. खल्लाबाद, उत्तर प्रदेश) असे अटक केलेल्या चालकाचे नाव आहे. याबाबत कंटेनरचा मालक संजय रामफल कालीरामना (वय ४१, रा. बलसाड, गुजरात) यांनी फिर्याद दिली आहे. त्यावरुन लोणीकंद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तमिळनाडू धर्मपुरी येथून माल घेऊन दोघे चालक एक कंटेनर घेऊन चाकणला येत होते. सोलापूर रोडवरुन येताना त्यांना रस्त्यात एका ठिकाणी बॅरिकेड॒स दिसल्यामुळे ते चुकून दुसऱ्या रस्त्याने गेले. पुढे तुळापूरला गेल्यानंतर त्यांना रस्ता चुकल्याचे लक्षात आले. रस्ता चुकल्यामुळे लांबच्या रस्त्याने जावे लागणार, या कारणावरून त्यांच्यात वाद सुरु झाला. त्यावेळी झालेल्या भांडणात खान याने अहमदच्या डोक्यात रॉडने वार केला. त्यात अहमद हा रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे पाहून खान हा तेथून पसार झाला.
 
स्थानिक नागरिकांनी कंटेनर का थांबला, हे बघितल्यावर कंटेनरच्या केबिनमध्ये मृतदेह आढळून आला. लोणीकंद पोलिसांनी कंटेनरचा मालक कालीरामना यांच्याशी संपर्क साधला. त्यांच्याकडून दोन्ही चालकांची नावे आणि मोबाईल क्रमांकांची माहिती घेतली. त्यावरून पोलिसांनी इंदापूर, पाटस ,दौंड भागातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यात शमशुल खान हा टेंभुर्णीमार्गे नाशिकला गेल्याचे समजले. पोलिसांनी खान याचा शोध घेऊन त्याला अटक केली.


मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply