Pune Accident : भरधाव कंटेनरने पायी जाणा-या विद्यार्थ्यांना चिरडले

तळेगाव स्टेशन : तळेगाव-चाकण महामार्गावर वडगाव फाट्यानजीक भरधाव कंटेनरने दुचाकीला ठोकर मारुन,पायी चाललेल्या तिघांना चिरडल्याने झालेल्या भीषण अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला तर दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत.दुचाकीस्वार मात्र अपघातात बालंबाल बचावले.

गुरुवारी (ता.०२) रात्री साडेदहाच्या सुमारास तळेगाव दाभाडे येथील स्वराज नगरीसमोर झालेल्या या अपघातामुळे मुंबई-पुणे महामार्गासह,तळेगाव-चाकण महामार्गावर बराच काळ वाहतूक कोंडी झाली होती.

चिरडलेले तिघे जण विद्यार्थी हे येथील एका अभियांत्रिकी महाविद्यालयात होऊ घातलेल्या बाईक रॅलीत सहभागी होण्यासाठी आले होते.पैकी मयत हा तामिळनाडू राज्यातील असल्याचे समजते.चाकणहून मुंबईकडे चाललेल्या कंटेनर क्रमांक एम एच ४८ बीएम-३५६० ने दुचाकी क्रमांक एम एच-१४ एजे-३२०७ ला धडक दिली.

त्यानंतर झाडाला धडकून पुढे पायी चाललेल्या विद्यार्थ्यांना चिरडल्यानंतर वळन घेत,रस्त्यावर आडवा होत विरुद्ध दिशेला जाऊन मातीच्या ढिगा-यावर जाऊन धडकला.अपघातानंतर चालक पळून गेला. गंभीर जखमींपैकी एकावर नागरे हाॅस्पीटल तर दुसर्‍यावर सोमाटणे येथील स्पर्श हाॅस्पीटलमधे उपचार चालू आहेत.

तळेगाव दाभाडे आणि वडगाव मावळ पोलीस ठाण्यांच्या नेमक्या हद्दीवर झालेल्या या अपघाताची माहीती कळताच दोन्ही पोलीस ठाण्यांसह वाहतूक विभागाच्या कर्मचाऱ्यांनी अपघातस्थळी पोहोचत कंटेनर बाजूला काढून वाहतूक सुरळीत केली.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply