IMD on Maharashtra Rain: उर्वरित हंगामात जोरदार बरसणार, तर विदर्भासह मध्य महाराष्ट्राची चिंता वाढणार, वाचा वेदर रिपोर्ट

Pune : नैर्ऋत्य मान्सूनच्या उर्वरित हंगामात (ऑगस्ट, सप्टेंबर) महाराष्ट्रासह देशाच्या बहुतांश भागांत सरासरीपेक्षा जास्त पावसाची शक्यता हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) वर्तवली आहे. ऑगस्टमध्ये विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागांत सरासरीपेक्षा कमी पाऊस होऊ शकतो, असे ‘आयएमडी’ने अंदाजात म्हटले आहे.

संस्थेचे महासंचालक डॉ. मृत्युंजय महापात्रा यांनी गुरुवारी मान्सून हंगामाचा उत्तरार्ध आणि ऑगस्ट महिन्याच्या हवामानाचा अंदाज ऑनलाइन पत्रकार परिषदेत जाहीर केला. ‘जूनमध्ये सरासरीपेक्षा कमी झालेल्या पावसानंतर जुलैमध्ये राज्यासह देशभरात बहुतेक राज्यांमध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस नोंदला गेला. आता ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये एकत्रितपणे सर्वसाधारण ते सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता ‘आयएमडी’ने वर्तवली आहे.

Mumbai Dam Water Level: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही जलाशयांमध्ये किती टक्के पाणीसाठा? वाचा आजची आकडेवारी

ऑगस्ट, सप्टेंबरमधील पावसाच्या अंदाजाबाबत डॉ. महापात्रा म्हणाले, ‘ईशान्येकडील राज्ये, लडाख आणि गुजरातचा काही भाग वगळता देशाच्या बहुतांश भागांमध्ये मान्सूनच्या उर्वरित हंगामात सरासरीपेक्षा जास्त (दीर्घकालीन सरासरीच्या १०६ टक्क्यांपेक्षा जास्त) पावसाची शक्यता आहे. ऑगस्टमध्ये मध्य, पूर्व आणि उत्तर भारतात काही भागांमध्ये सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता असल्याने सप्टेंबरमध्ये देशात सरासरीपेक्षा जास्त पाऊस होऊ शकतो.’

दोन महिन्यांत अधिक पाऊस

‘महाराष्ट्रात आगामी दोन महिन्यांत एकत्रितपणे सरासरीपेक्षा जास्त पावसाची शक्यता आहे. मात्र, ऑगस्टमध्ये विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि उत्तर कोकणाच्या काही भागांत सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता आहे. येत्या आठ ऑगस्टपर्यंत राज्यात पाऊस सक्रिय राहणार असून, त्यानंतरच्या आठवड्यात पावसाचे प्रमाण कमी होण्याचा अंदाज आहे,’ असेही डॉ. मृत्युंजय महापात्रा म्हणाले.

‘ला निना’ सप्टेंबरमध्ये

‘आयएमडी’सह जगभरातील हवामानशास्त्रीय मॉडेलनुसार प्रशांत महासागरात सध्या न्यूट्रल स्थिती असून, ऑगस्टअखेरीस किंवा सप्टेंबरमध्ये तिथे ‘ला निना’ची स्थिती निर्माण होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे सप्टेंबरमध्ये देशात पाऊस अधिक पडू शकतो,’ असे डॉ. मृत्युंजय महापात्रा यांनी सांगितले.

मान्सूनचा पूर्वार्ध (जून, जुलै) (सरासरीच्या तुलनेत)

देशभरातील एकूण पाऊस : १०२ टक्के
राज्यातील एकूण पाऊस : ३९ टक्के जास्त
कोकण : ४२ टक्के जास्त
मध्य महाराष्ट्र : ४६ टक्के जास्त
मराठवाडा : २८ टक्के जास्त
विदर्भ : ३७ टक्के जास्त

ताम्हिणीत सर्वोच्च पाऊस

जुलै महिन्यात देशभरात अतिशय जास्त पावसाच्या (२४ तासांत २०४.५ मिलीमीटरपेक्षा जास्त) १९३ घटना; तर जास्त पावसाच्या (२४ तासांत ११५.६ ते २०४.५ मिलीमीटर) १०३० घटनांची नोंद झाली. महाराष्ट्रातील ताम्हिणी येथे २५ जुलै रोजी नोंदला गेलेला ५६० मिलीमीटर पाऊस हा जुलैमध्ये देशातील सर्वोच्च्च पाऊस ठरला.

पुढील चार दिवस पावसाचा अंदाज

पश्चिम बंगालजवळ वातावरणात हवेची चक्रिय स्थिती असून, पुढील २४ तासांत तिथे कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याचा अंदाज आहे. दुसरीकडे दक्षिण गुजरात ते केरळ दरम्यान किनारपट्टीला समांतर कमी दाबाचा पट्टाही (ऑफ शोअर ट्रफ) सक्रिय आहे. या स्थितीमुळे तीन ऑगस्टपर्यंत मध्य महाराष्ट्राच्या घाट क्षेत्रात आणि कोकणात काही ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता आहे. पाच ऑगस्टपर्यंत कोकण आणि मध्य महाराष्ट्रात, तर चार ऑगस्टपर्यंत विदर्भात काही ठिकाणी जास्त ते अतिजास्त पाऊस होऊ शकतो, असा अंदाज आहे.

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply