Pune : ससून रुग्णालयात बॉम्ब ठेवल्याचा मेसेज, खबऱ्यांकडून पोलिसांना काढली माहिती अन्

 

Sassoon Hospital bomb threat News : पुण्यातील ससून हॉस्पिटलमध्ये बॉम्ब ठेवल्याची धमकी देणारा मेसेज आला अन् एकच खळबळ उडाली. पुणे पोलिसांनी सुत्रे हालवली अन् आरोपीला बेड्या ठोकल्या. बंडगार्डन पोलिसांनी अरविंद कृष्णा कोकणी (वय २९) याला येरवडा परिसरातून अटक केली आहे. आरोपी हा ससून हॉस्पिटलमध्ये सुरक्षारक्षक म्हणून कार्यरत आहे. १२ मे रोजी ससूनमधील एका डॉक्टरच्या मोबाईलवर अज्ञात नंबरवरून "हॉस्पिटलमध्ये बॉम्ब ठेवला आहे" असा धमकीचा मेसेज आला. यानंतर बंडगार्डन पोलीस आणि बॉम्बशोधक पथकाने (बीडीडीएस) हॉस्पिटल परिसराची कसून तपासणी केली, मात्र काहीही संशयास्पद आढळले नाही. मेसेजमुळे हॉस्पिटल परिसरात काही वेळ दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते.

बंडगार्डन पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. तपासादरम्यान, आरोपीने ससूनमधील एका महिला रुग्णाचा मोबाईल फोन चोरून त्यावरून धमकीचे मेसेज केल्याचे उघड झाले. पहिला मेसेज एका डॉक्टरला पाठवून त्याने फोन स्विच ऑफ केला. दुसऱ्या दिवशी पुन्हा फोन ऑन करून ससूनच्या वैद्यकीय अधीक्षकांना दुसरा धमकीचा मेसेज पाठवला आणि फोन पुन्हा बंद केला. पोलिसांनी खबऱ्यांच्या माहितीवरून आरोपीला अटक केली.

आरोपीने असे कृत्य का केले, याचा तपास बंडगार्डन पोलीस करत आहेत. त्याच्याकडून चोरीचा मोबाईल जप्त करण्यात आला. पोलिसांकडून आरोपीची अधिक चौकशी सुरू आहे. या घटनेमुळे हॉस्पिटलच्या सुरक्षाव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. पोलिसांनी नागरिकांना घाबरू नये आणि संशयास्पद गोष्ट आढळल्यास त्वरित संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.

 

 

 

 

 

 

 

 

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply