Pune : पूजा खेडकर यांच्या आई-वडिलांचा खरंच घटस्फोट झालाय का? केंद्र सरकारला संशय, पोलिसांना चौकशीचे आदेश !

Pune : आई-वडील विभक्त झाल्याचं सांगत प्रशिक्षाणीर्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांनी ओबीसी नॉन क्रिमी लेअर प्रमाणपत्र सादर केले होते. परंतु, केंद्र सरकारला आता पूजा खेडकर यांच्या पालकांच्या वैवाहिक स्थितीवरच संशय आला आहे. त्यामुळे पालकांची वैवाहिक स्थिती तपासण्यासाठी शहर पोलीस चौकशी करत असल्याचं वृत्त इंडियन एक्स्प्रेसने दिलं आहे.

नागरी सेवा परीक्षेत पूजा खेडकर यांनी त्यांची खोटी ओळख निर्माण केली होती. त्यामुळे त्या चौकशीच्या फेऱ्यात अडकल्या आहेत. २०२३ बॅचच्या प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी असलेल्या खेडकरांनी जात प्रमाणपत्र आणि अपंग प्रमाणपत्र दाखवून यंत्रणेची दिशाभूल केली असल्याचा आरोप आहे. पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांनी घातलेल्या गोंधळानंतर हा सर्व प्रकार उजेडात आला. अखेर त्यांचं प्रशिक्षण थांबवून त्यांना लाल बहादूर शास्त्री नॅशनल अॅकॅडमी ऑफ अॅडमिनिस्ट्रेशनमध्ये परत बोलावण्यात आले आहे.

Gold Rate Today: बजेटनंतर 'सोना कितना सस्ता हैं'; मुंबई-पुण्यात सोन्याच्या दरात मोठी घसरण

पूजा खेडकर यांच्या पालकांच्या वैवाहिक स्थितीची माहिती देताना पुणे शहर पोलिसांच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितलं की, केंद्र सरकारच्या सूचनेनुसार दिलीप आणि मनोरमा खेडकर यांचा घटस्फोट झाला आहे की नाही याची पडताळणी करण्यासाठी आम्ही तपास सुरू केला आहे.”

मॉक इंटरव्ह्यूमध्ये काय म्हणाल्या होत्या पूजा खेडकर?

एका खासगी इन्स्टिट्युटच्या मॉक इंटरव्ह्यूमध्ये पूजा खेडकर म्हणाल्या होत्या की त्यांचे आई-वडिल विभक्त झाले असून त्यांच्या कुटुंबाचं उत्पन्न शून्य आहे. दरम्यान, पूजा खेडकर यांचे वडील नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीकडून अहमदनगर येथून उभे होते. त्यात त्यांनी केलेल्या दाव्याच्या विरोधात पूजा खेडकर यांनी दावा केला आह. निवडणूक घोषणापत्रात हे दोघेही अद्याप एकत्र असल्याचं स्पष्ट केलं आहे. तर, पूजा खेडकरांनी पालक विभक्त झाल्याचा दावा केला आहे. त्यामुळे संशय निर्माण झाला आहे.

मनोरमा खेडकर यांचा जामीन अर्ज फेटाळला

दरम्यान, जून २०२३ मध्ये पुणे जिल्ह्यातील एका शेतकऱ्याला बंदूक दाखवल्याप्रकरणी मनोरमा खेडकर यांना अटक करण्यात आली आहे. सोमवारी न्यायदंडाधिकारी न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळला. तर, वडील दिलीप खेडकर यांना अंतरिम जामीन मिळाला असून त्यांना अटकेपासून संरक्षण मिळालं आहे.

दिलीप खेडकर यांच्या नावे ४० कोटींपेक्षा अधिक संपत्ती

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे निवृत्त अधिकारी दिलीप खेडकर यांच्यावरही बेहिशेबी संपत्तीची तक्रार आहे. वंचित बहुजन आघाडी (VBA) उमेदवार म्हणून २०२४ च्या लोकसभा निवडणुका लढवताना त्यांनी ४० कोटी रुपयांपेक्षा जास्त संपत्ती आणि ४९ लाख रुपयांचे वार्षिक उत्पन्न जाहीर केले होते. महाराष्ट्र लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्यांच्या अहमदनगर युनिटकडून त्यांच्या संपत्तीचा अहवाल मागवला आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply