Budget 2024 : भरघोस निधी की पोकळ घोषणा? केंद्रीय अर्थसंकल्पाकडे पुणेकरांचे लक्ष; ठोस तरतूद हवी

Pune : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज, मंगळवारी अर्थसंकल्प सादर करणार आहेत. केंद्र सरकारच्या मदतीने पुणे शहर तसेच जिल्ह्यात मेट्रो, जायका यांसह विविध प्रकल्प आणि योजना राबवल्या जात आहेत. याशिवाय वंदे भारत एक्स्प्रेस, पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे यांसह अन्य योजना, विमानतळाच्या धावपट्टी विस्तारासाठी निधी मिळावा, या अपेक्षेबरोबरच काही नवे प्रकल्प आणि भरघोस निधी पुण्याच्या वाट्याला यावा, अशी अपेक्षा पुणेकरांना आहे.

सीतारामन यांनी एक फेब्रुवारी रोजी अंतरिम अर्थसंकल्प सादर केला होता. या अर्थसंकल्पात पुण्याच्या वाट्याला फारसे काहीच आले नव्हते. लोकसभा निवडणुकानंतर ‘एनडीए’चे सरकार सत्तेवर आल्यानंतर अर्थ मंत्रालयाची धुरा पुन्हा सीतारामन यांच्याकडे आली. आता सीतारामन अर्थसंकल्प सादर करणार आहेत. त्यामुळे या अर्थसंकल्पात पुण्यासाठी किती तरतूद असणार, याकडे पुणेकरांचे लक्ष लागले आहे.

Pimpri Hit And Run : दीड वाजता आईला कारने उडवलं, अंगावर स्कूटर पडली, हॉस्पिटलला गेलो आणि... लेकीने सांगितला थरार

पुणे हे महत्त्वाचे रेल्वे स्थानक असून, आतापर्यंत पुण्यातून सुटणारी एकही ‘वंदे भारत’ सुरू झालेली नाही. याशिवाय पुणे रेल्वे स्थानकातून अन्य काही रेल्वे सुरू होणे अपेक्षित आहे. पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पालाही अजून हिरवा कंदिल मिळालेला नाही. स्वारगेट ते कात्रज या मार्गिकेसाठी केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी अद्याप मिळालेली नाही; तसेच याविषयी निधीचीही चर्चा नाही. तसेच, हिंजवडी-शिवाजीनगर मार्गिकेचाही विस्तार प्रस्तावित आहे. त्यामुळे मेट्रोसाठी केंद्राकडून मोठी तरतूद अपेक्षित आहे.

सार्वजनिक वाहतुकीचे काय?

सर्वाधिक इलेक्ट्रिक बसगाड्यांचा ताफा असलेल्या पुणे महानगर परिवहन महामंडळाला (पीएमपी) आणखी ई-बस; तसेच सीएनजी बस खरेदी करण्यासाठी केंद्राच्या योजनेतून निधीची आवश्यकता आहे. पुणे विमानतळाचे नवे टर्मिनल नुकतेच कार्यान्वित झाले आहे. परंतु, आंतरराष्ट्रीय विमानसेवेचा विस्तार करण्यासाठी धावपट्टीचा विस्तार आवश्यक आहे. त्यासाठी मोठा खर्च येणार असल्याने केंद्राने त्यात सिंहाचा वाटा उचलावा, अशी पुणेकरांची भावना आहे.

‘जायका’साठी तरतूद होणार का?

शहराच्या जुन्या हद्दीतील १०० टक्के सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी सुरू असलेल्या ‘जायका’ प्रकल्पासाठी वेळेवर निधी मिळावा. तसेच, नव्याने समाविष्ट झालेल्या गावांमध्येही सांडपाणी वाहिन्या व प्रकल्प उभारण्यासाठी केंद्राकडून निधी मिळावा, अशी पुणेकरांची मागणी आहे.

ऐतिहासिक वास्तूंसाठी हवा निधी

पुण्यामध्ये अनेक केंद्रीय संशोधन; तसेच शैक्षणिक संस्था आहेत. त्यासाठीही भरीव निधीची अपेक्षा आहे. याशिवाय पुण्यातील शनिवारवाड्यासह अन्य ऐतिहासिक वास्तूंच्या जतनासाठीही केंद्राने मदत करावी, अशी अपेक्षा पुणेकरांना आहे.

शैक्षणिक अपेक्षांचीही पूर्ती व्हावी

‘आयआयआयटी’च्या तळेगाव दाभाडे येथील संकुलाचे काम वेळेत मार्गी लागण्यासाठी निधी मिळावा. वैकुंठ मेहता राष्ट्रीय सहकार व्यवस्थापन संस्थेचे सहकार विद्यापीठात रूपांतर व्हावे. याशिवाय पुण्यामध्ये इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (आयआयएम) सुरू व्हावे, अशीही पुणेकरांची अपेक्षा आहे.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply