Pune : वेताळ टेकडी फोडल्यास शहरातील भूजल धोक्यात? जलव्यवस्थापन तज्ज्ञ सतीश खाडे यांचे मत

Pune  : ‘वेताळ टेकडी फोडून पौड रस्ता-बालभारती रस्त्यासाठी तयार करण्यात येणाऱ्या नियोजित भुयारी मार्गामुळे बशीच्या तळाशी येणारे पाणी तिथेच साचून राहील. या मार्गासाठी करण्यात येणाऱ्या स्फोटांमुळे जमिनीतल्या आतल्या भेगांचे प्रवाह नष्ट होतील. त्यामुळे जमिनीत मुरणाऱ्या पाण्याचे प्रमाण कमी होणार असून, शहरातील भूजल धोक्यात येईल,’ असे मत जलव्यवस्थापन तज्ज्ञ सतीश खाडे यांनी शनिवारी व्यक्त केले.

दिशा-२०२५ आणि अंतर्नाद कला साधना यांच्यातर्फे न्यू इंग्लिश स्कूलच्या गणेश सभागृहात आयोजित ‘पाण्यासाठी एक साद…’ या संगीत मैफिलीचे निवेदन खाडे करत होते. त्या वेळी पाण्याचे महत्त्व, जल व्यवस्थापन आणि जलप्रदूषण या विषयावर खाडे यांनी भाष्य केले. कलाकार नीता उपासनी, गौरी बापट, अनुजा गाडे, प्रिया अय्यर, अनघा पाठक यांनी पाऊस, तळी, नदी, सागर अशा पाण्याच्या विविध रूपांवरील गाणी मैफिलीत सादर केली. डॉ. विद्याधर बापट, उदय गुजर, विजय सबनीस आदी या वेळी उपस्थित होते.

Pune https://punenews24.in/latest-news/pune-513/

‘स्वच्छ पाणी पुणेकर वापरतात. पुणेकरांनी वापरलेले सुमारे ८० कोटी लिटर सांडपाणी कोणतीही प्रक्रिया न करता मुळा-मुठेच्या पात्रात सोडले जाते. हेच पाणी पुढे नदीच्या प्रवाहाबरोबर गावागावांत जाते. या प्रदूषित पाण्यावर पिके काढली जातात, जनावरांसाठीही तेच पाणी वापरले जाते. या रानातला भाजीपाला, धान्य आणि जनावरांचे मांस शहरातच विक्रीसाठी आणले जाते. त्यामुळे गावासह शहरातही रोगराई वाढते. मुळा-मुठा नदीचे प्रदूषण हे धोक्याच्या पातळीपेक्षा साठपट अधिक आहे,’ असे खाडे यांनी या वेळी नमूद केले.

या गीतमैफिलीत पाणी व पाऊस यावर आधारित ‘घन बरसूनी आले’, ‘रिमझिम गिरे सावन’, ‘मळ्याच्या मळ्यामंदी पाटाचं पाणी जात’, ‘ओ सजना बरखा बहार आयी’, ‘जलाशयाच्या लक्ष दर्पणी’, ‘पाण्यातले पहाता प्रतिबिंब हासणारे’, ‘तोहरे ताल मिले नदी के जलमे’, ‘कशी काळ नागिणी, सखे गं वैरीण झाली नदी’, ‘इक लडकी भीगी भागीसी’, ‘नभ उतरू आलं’ इत्यादी लोकप्रिय गीते सादर झाली.

खाडे यांनी उपस्थितांना पाण्याच्या सुयोग्य वापरासंबंधीच्या प्रतिज्ञेतून शपथ दिली. पाण्यासंबंधी पुणेकर नागरिकांमध्ये जागरुकता व संवेदनशीलता यावी यासाठी पुण्याच्या विविध भागात ‘पाण्यासाठी एक साद’ हा कार्यक्रम आयोजित करण्यासाठी त्यांनी संपर्क साधण्याचे आवाहन केले.

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply