Pooja Khedkar : खेडकर दाम्पत्याच्या बंगल्याची झडती; धमकाविण्यासाठी वापरलेले पिस्तूल, काडतुसे जप्त

Pune  : वादग्रस्त प्रशिक्षणार्थी सनदी अधिकारी पूजा खेडकर यांची आई मनोरमा आणि वडील दिलीप या दाम्पत्याच्या बाणेर येथील नॅशनल हाउसिंग सोसायटीतील बंगल्याची पुणे ग्रामीण पोलिसांनी शुक्रवारी दुपारी दोन तास झडती घेतली. जागेच्या वादात मनोरमाने शेतकऱ्यांना धमकावण्यासाठी वापरलेले पिस्तूल व तीन काडतुसे झडतीदरम्यान पोलिसांनी बंगल्यातून जप्त केली असून, या घटनेच्या ‘व्हायरल व्हिडिओ’त दिसणारी काळ्या रंगाची अलिशान कारही पोलिस ठाण्यात आणण्याच्या सूचना केल्या आहेत.

मुळशी तालुक्यातील धाडवली गावातील जमिनीच्या वादातून शेतकऱ्यांना पिस्तूल दाखवून धमकावल्याप्रकरणी मनोरमा व दिलीप खेडकर दाम्पत्यासह अंबादास खेडकर आणि अंगरक्षक अशा सात जणांविरोधात पौड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्याविरोधात पंढरीनाथ कोंडिबा पासलकर (वय ६५, रा. केडगाव, दौंड) या शेतकऱ्याने पौड पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. हा गुन्हा दाखल झाल्यावर फरारी झालेल्या मनोरमाला पोलिसांनी महाड परिसरातून गुरुवारी अटक केली. न्यायालयाने तिला तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

Vidarbh Rain Update : विदर्भात हाय अलर्ट! विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस, IMD चा इशारा

या गुन्ह्याचा तपास आता पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेकडे देण्यात आला आहे. त्यानुसार, गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांच्या पथकाने खेडकर दाम्पत्याच्या बंगल्याची झडती घेतली. दोन तास ही झडती सुरू होती. या वेळी पोलिसांनी मनोरमाच्या समक्ष बंगल्यातून पिस्तुलासह तीन काडतुसे जप्त केली. या कारवाईच्या वेळी चतुःशृंगी पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक राजकुमार केंद्रे यांच्यासह पुणे शहर व ग्रामीण पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात होता.

शस्त्र परवाना रद्दची नोटीस

पुणे शहर पोलिसांनी मनोरमा खेडकरला पिस्तूल बाळगण्यासाठीचा परवाना दिला आहे. मनोरमाने शेतकऱ्यांना पिस्तुलाचा धाक दाखविल्याचा ‘व्हिडिओ’ व्हायरल झाल्यानंतर त्यांनी या शस्त्र परवान्यातील अटी-शर्तींचा भंग केल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे ‘हा शस्त्र परवाना रद्द का करू नये,’ अशी नोटीस पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी मनोरमा खेडकरला बजावली असून, त्यावर दहा दिवसांच्या आत खुलासा करावा, अशी सूचना दिली आहे.

या गुन्ह्यात न्यायालयाने मनोरमा खेडकर यांना तीन दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. तपासाच्या अनुषंगाने खेडकर दाम्पत्याच्या बंगल्याची झडती घेण्यात आली. त्या वेळी शेतकऱ्याला धमकाविण्यासाठी वापरलेले पिस्तूल आणि तीन काडतुसे जप्त करण्यात आली आहे. त्या ‘व्हायरल व्हिडिओ’त दिसणारी खेडकर यांची चारचाकी पोलिस ठाण्यात आणण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply