Pune : सावधान ! महापालिकेच्या इमारतीमध्ये हेल्मेट शिवाय प्रवेश कराल तर…!

Pune : महापालिकेच्या सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना आता हेल्मेटचा वापर सक्तीचा करण्यात आला आहे. महापालिकेच्या मुख्य इमारतीसह क्षेत्रीय कार्यालय आणि महापालिका इमारतींच्या आवारात हेल्मेटविना येणाऱ्या कर्मचाऱ्यांना प्रवेश देण्यात येऊ नये; तसेच वाहनतळावरही त्यांना वाहन उभे करण्याची परवानगी देऊ नये, असा आदेश महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी. यांनी सुरक्षा विभागाला दिला आहे. आज गुरुवारपासून (१४ नोव्हेंबर) या निर्णयाची अंमलबजावणी केली जाणार आहे. या आदेशाकडे दुर्लक्ष करत उल्लंघन करणाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येणार असून, त्याची नोंद संबंधित कर्मचारी, अधिकारी यांच्या सेवापुस्तकातही घेण्यात येणार असल्याचा इशारा अतिरिक्त आयुक्तांनी काढलेल्या आदेशात देण्यात आला आहे.

मोटर वाहन कायद्यानुसार दुचाकी चालविणारी व्यक्ती आणि पाठीमागे बसणाऱ्या सहप्रवाशाला हेल्मेटचा वापर बंधनकारक आहे. गेल्या महिन्यात दुचाकीचालकांचे प्राणांतिक अपघात कमी करण्यासाठी पुणे विभागीय आयुक्त कार्यालयात एक बैठक झाली. त्यात या विषयावर गांभीर्याने चर्चा झाली. बैठकीमध्ये झालेल्या चर्चेत सर्वप्रथम शासकीय व निमशासकीय कार्यालयात दुचाकीवर येणारे अधिकारी आणि कर्मचारी यांना हेल्मेट परिधान करण्याची सक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला.

London : समांथा हार्वे यांच्या ‘ऑर्बिटल’ला बुकर ; अंतराळावरील कादंबरीचा पहिल्यांदाच सन्मान

विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार यांनी याबाबतचे आदेश सर्व सरकारी कार्यालयप्रमुखांना देत त्याची तातडीने अंमलबजावणी करण्याच्या सूचना दिल्या होत्या. विभागीय आयुक्त कार्यालयाने गेल्या महिन्यात ऑक्टोबरमध्ये तसे आदेशही काढले आहेत. या आदेशानुसार महापालिका प्रशासनाने देखील महापालिका भवन व महापालिकेच्या शहरातील अन्य कार्यालय व इमारतींच्या आवारात दुचाकीवर येणारे अधिकारी आणि कर्मचारी यांच्यासाठी हेल्मेटचा वापर बंधनकारक असेल, असे आदेश काढले आहेत. याची तातडीने अंमलबजावणी करण्याच्या सूचना पालिकेच्या सुरक्षा विभागाला केल्या आहेत. या आदेशाचे उल्लंघन केल्यास शिस्तभंग म्हणून संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्याच्या सेवापुस्तकात नोंद करण्याचेही अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी. यांनी दिलेल्या आदेशात नमूद करण्यात आले आहे.

रस्त्यांवर होणाऱ्या अपघातांमध्ये मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी हेल्मेटचा वापर आणि वाहतूक नियमांचे पालन करण्याची सुरुवात महापालिकेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी करावी, यासाठी विभागीय आयुक्त कार्यालयाच्या आदेशानुसार महापालिका ही अंमलबजावणी करत असल्याचे या आदेशात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे आज गुरुवारपासून (१४ नोव्हेंबर) या आदेशाची अंमलबजावणी केली जाणार आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply