Pune : “पंतप्रधान मोदींच्या अगाध ज्ञानाचं…”; महात्मा गांधींबाबत केलेल्या ‘त्या’ विधानावरून शरद पवारांचा टोला!

Pune : महात्मा गांधी यांच्यावर जेव्हा पहिला चित्रपट बनला, तेव्हा जगभरात गांधींबाबत कुतूहल निर्माण झालं. त्यापूर्वी त्यांना कोणीही ओळखत नव्हतं, असं विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही महिन्यांपूर्वी केलं होतं. त्यांच्या या विधानानंतर मोठ्या प्रमाणात राजकीय प्रतिक्रियाही उमटल्या होत्या. दरम्यान, या विधानावरूनच आता शरद पवार यांनी पंतप्रधान मोदींना टोला लगावला आहे. पुण्यात महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी बोलताना शरद पवार यांनी पंतप्रधान मोदी यांना लक्ष्य केलं.

काय म्हणाले शरद पवार?

महत्मा गांधी यांनी संपूर्ण जगात देशाची प्रतिष्ठा वाढवली. त्यांचे विचार संपूर्ण जगाने स्वीकारले. आफ्रिकेतील नेत्यांनीही स्वांतत्र मिळवण्यासाठी गांधींचा विचार स्वीकारला. पण कधी कधी मला गंमत वाटते, की आपल्या देशाच्या पंतप्रधानांनी एक दिवस सांगितलं, की महात्मा गांधींवर जो चित्रपट निघाला होता, त्या चित्रपटामुळे गांधींचं नाव जगात झालं. असं अगाध ज्ञान त्यांनी दाखवलं, त्याबाबत मी त्यांचे कौतुक करतो, असा टोला त्यांनी लगावला.

Pune : ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंना शिवीगाळ प्रकरणी २० ते २५ जणांविरुद्ध गुन्हा

पुढे बोलताना ते म्हणाले, आम्ही स्वातंत्र्यानंतरच्या काळात वाढलो. पण स्वातंत्र्य चळवळीचा अभ्यासक म्हणून आम्हाला महात्मा गांधींबाबत आकर्षण होतं. आपण अहिंसेच्या मार्गाने परिवर्तन आणि राष्ट्रउभारणी करू शकतो. तसेच स्वातंत्र्य प्राप्त करू शकतो, हा संदेश महात्मा गांधींनी दिला.

पंतप्रधान मोदी नेमकं काय म्हणाले होते?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकताच एबीपी माझाला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी विविध विषयांवर त्यांची भूमिका स्पष्ट केली. यावेळी बोलताना ते म्हणाले, “महात्मा गांधी एक मोठं व्यक्तिमत्त्व होतं. आपण जगभरात त्यांची ओळख निर्माण करायला हवी होती. ही आपली जबाबदारी होती. मात्र, आपण त्यात अपयशी ठरलो. त्यांना कोणी ओळखत नव्हतं. ज्यावेळी महात्मा गांधींवर पहिल्यांदा चित्रपट बनला तेव्हा जगभरात गांधी कोण आहे? याबाबत कुतूहल निर्माण झालं. त्यांची ओळख निर्माण करण्यासाठी आपण ७५ वर्षात काहीही केलं नाही” अशी प्रतिक्रिया नरेंद्र मोदी यांनी दिली.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply