Pune : राज्यात अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान…जाणून घ्या कोणत्या जिल्ह्यांत किती नुकसान…

Pune : राज्यात जुलै आणि ऑगस्ट महिन्यांत झालेल्या अतिवृष्टीमुळे सुमारे १.७० लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. नुकसानीचा सर्वाधिक फटका विदर्भाला बसला आहे. एक आणि दोन सप्टेंबर रोजी मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची माहिती संकलित करण्याचे काम कृषी विभागाकडून अद्याप सुरू आहे.

कृषी विभागातून मिळालेल्या माहितीनुसार, जुलै महिन्यात राज्यातील ३६ पैकी २५ जिल्ह्यांना कमी-जास्त प्रमाणात अतिवृष्टीचा फटका बसला. नुकसानीचे प्रमाण विदर्भात जास्त होते. विदर्भात सुमारे ९७ हजार ६५२ हेक्टरवरील पिके मातीमोल झाली आहेत. बुलडाणा, चंद्रपूर, गडचिरोली आणि वर्धा जिल्ह्यांना फटका बसला. त्या खालोखाल मराठवाड्यातील हिंगोली, परभणी आणि कोल्हापूर जिल्ह्यात मोठे नुकसान झाले आहे. कोल्हापूर जिल्ह्यात जूनमध्ये पावसाने ओढ दिली होती. जुलैमध्ये मुसळधार पाऊस पडून पूरस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे कोल्हापूरमध्ये भात, ऊस, सोयाबीन, नाचणी, भुईमूग आणि भाजीपाला पिकांचे नुकसान झाले होते.

Pune : पुण्यात आधीच डेंग्यूचा धोका अन् त्यातच आता रक्तासह प्लेटलेटचा तुटवडा

जुलै महिन्याच्या तुलनेत ऑगस्ट महिन्यात अतिवृष्टीमुळे नुकसान कमी झाले आहे. ऑगस्ट महिन्यात २०३३२.७९ हेक्टरवरील पिकाचे नुकसान झाले आहे. ऑगस्ट महिन्यात विदर्भाला अतिवृष्टीचा फटका बसला. अमरावतीत सर्वाधिक १८२७९ हेक्टरवरील सोयाबीन, कापूस, तूर, मका या पिकांना फटका बसला. त्या खालोखाल बुलडाणा जिल्ह्यातील चिखली, मेहकर तालुक्यांत सोयाबीन पिकाचे हुमणी अळीमुळे मोठे नुकसान झाले. दोन तालुक्यात ८८९ हेक्टरवर सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त झाले.

सोयाबीन उद्ध्वस्त

राज्यात यंदाच्या खरिपात ऊस वगळून सरासरी १,४३,२१,४३९ हेक्टरवर पेरणी होते. यापैकी सोयाबीनची पेरणी ५०,५२,५३३ हेक्टरवर झाली आहे. सोयाबीनचे चांगले उत्पादन निघून चांगले पैसे होणे अपेक्षित असतानाच जुलै, ऑगस्टमधील पावसाने राज्याच्या सर्वच भागातील सोयाबीनचे नुकसान झाले आहे. जुलै, ऑगस्ट हा काळ सोयाबीनच्या शेंगा भरण्याचा काळ असतो. नेमक्या याच काळात अतिवृष्टी, संततधार पावसामुळे पिके पाण्यात बुडून पिवळी पडून नुकसान झाले. सप्टेंबरच्या एक, दोन तारखेला मराठवाड्यात झालेल्या अतिवृष्टीत पुन्हा सोयाबीनचे प्रचंड नुकसान झाले आहे. आता सोयाबीनची काढणी सुरू आहे. या काळात पावसाने उघडीप न दिल्यास नुकसानीचा आकडा आणखी वाढू शकतो.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply