Pune : विना परवानगी रस्ते खोदाला तर कारवाई

पुणे : पथ विभागाकडून रस्त्यांची कामे केल्यानंतर त्याच रस्त्यावर पुन्हा रस्ता खोदण्याचे नियोजन केले जात असल्याचा प्रकार टिळक रस्त्यावर उघडकीस आला. सर्व विभागांची बैठक होऊन सुद्धा असे प्रकार घडत असल्याने आता पाणी पुरवठा विभागाने खास परिपत्रक काढून अधिकाऱ्यांनी विना परवागनी कामे केल्यास कारवाई केली जाईल अशी तंबी देण्यात आली आहे.

पुणे महापालिकेच्या पथ विभागाकडून कोट्यावधी रुपये खर्च करून रस्त्याचे डांबरीकरण, क्रॉंक्रिटीकरण सुरू केले आहे. गेल्या दोन वर्षापासून पुणेकरांना रस्त्यावरील खड्ड्यांचा प्रचंड त्रास सहन करावा लागला आहे.

अद्यापही शहराच्या अनेक भागात खड्डे पडलेले, खचलेले, पॅचवर्क योग्य पद्धतीने न केल्याने रस्त्याची अवस्था ठिगळांसारखी झालेली आहे. त्याचा वाहनचालकांच्या कमरेला त्रास होत आहे. त्यामुळे महापालिकेच्या या कारभारावर प्रचंड टीका झाल्यानंतर आता ३०० कोटी रुपये खर्च करून रस्त्यांचे डांबरीकरण आणि काँक्रिटीकरण केले जाणार आहे.

यापार्श्‍वभूमीवर पथ विभागाने पाणी पुरवठा, विद्युत, मलःनिसारण विभागाची बैठक घेऊन ज्या रस्त्यांची कामे केली जाणार आहेत, तेथील खोदकाम आत्ताच पूर्ण करून घ्या अशा सूचना दिल्या. त्यावर या सर्व विभागांनी आम्हाला खोदकाम करायचे नाही असे सांगितले.

टिळक रस्त्यावर डांबरीकरण करण्यात आल्यानंतरच दुसऱ्या दिवशी पाणी पुरवठा विभागाने सारसबाग कोठी ते शुक्रवार पेठे मध्ये जलवाहिनी टाकण्याचे काम सुरू केले. त्यामध्ये टिळक रस्ता खोदण्यासाठी मार्किंग करण्यात आले होते. पण हा रस्ता नवीन असल्याचे निदर्शनास आणून दिल्यानंतर हे काम थांबले. मात्र, यावरून प्रशासनातील गोंधळ समोर आला.

यासंदर्भात पाणी पुरवठा विभागाचे प्रमुख अनिरुद्ध पावसकर यांनी परिपत्रक काढून अधिकाऱ्यांना तंबी दिली आहे. कोणत्याही परिस्थितीत पथ विभागाने केलेल्या ‘दोष दायित्व कालावधीतील (डिफेक्ट लायबिलिटी पिरियड-डीएलपी) रस्त्याचे काम परवानगी घेतल्याशिवाय करू नये, रोड क्राॅसिंग देखील करू नये.

रस्त्याबाबत काही शंका वाटल्यास समान पाणी पुरवठ्याच्या अधिक्षक अभियंत्यांशी संपर्क साधावा. विनापरवानगी रस्ता खोदल्यास कनिष्ठ अभियंता, दुय्यम अभियंत्यावर कठोर कारवाई केली जाईल, असे आदेशात नमूद केले आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply