Pune : ठरलं तर! कसबा आणि चिंचवड पोट निवडणुकीत मनसेची भाजपला साथ; राज ठाकरेंचा आदेश

Pune Bypoll Election: सध्या राज्याच्या राजकारणात कसबा आणि चिंचवड विधानसभा मतदार संघातील पोट निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. याच निवडणुकी संदर्भातील सर्वात मोठी बातमी समोर येत असून दोन्ही जागांवर मनसे भाजपला मदत करणार असल्याचे निश्चित झाले आहे.

आज मनसे आणि भाजपामध्ये नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीत हा निर्णय घेतला गेला आहे. मात्र भाजपच्या प्रचारात मनसे सहभागी होणार नाही, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. 

याबाबत अधिक माहिती अशी की, पुण्यातील भाजपा आणि मनसे नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीला पुण्याचे भाजपाचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ आणि माधुरी मिसाळ उपस्थित होत्या. तर मनसे कडून शहराध्यक्ष साईनाथ बाबर आणि मनसे नेते बाबू वागस्ककर यांनी बैठकीला हजेरी लावली होती.

या बैठकीनंतर कसबा आणि चिंचवड पोट निवडणुकीमध्ये मनसे भाजपला मतदान करणार असल्याची घोषणा करण्यात आली. याबद्दल वरिष्ठ पातळीवरुन आदेश देण्यात आल्याचेही सांगण्यात आले आहे.

दरम्यान, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ही निवडणूक बिनविरोध करण्याचा आग्रह धरला होता. तसे पत्रही त्यांनी महाविकास आघाडीला दिले होते. मात्र महाविकास आघाडीकडून ही निवडणुकी लढवण्याची तयारी आधीपासूनच सुरू करण्यात आली होती.

या निवडणूकीसाठी भाजपाकडून चिंचवडमध्ये अश्विनी जगताप यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर कसब्यामध्ये हेमंत रासणे भाजपाकडून निवडणुक लढवत आहेत.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply