Pimpri : ‘या’ मतदारसंघात पारंपरिक विरोधकांतील चौथी लढत अस्तित्वाची

Pimpri : चिंचवड विधानसभा मतदारसंघात जगताप कुटुंब आणि राहुल कलाटे या पारंपरिक राजकीय विरोधकांमध्ये चौथ्यांदा लढत होत आहे. दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर होत असलेल्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीत रिंगणात उतरलेले त्यांचे बंधू शंकर जगताप आणि राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाकडून कलाटे यांच्यात दुरंगी लढत होत आहे. जगताप यांच्यापुढे बालेकिल्ला राखण्याचे आव्हान असून, राष्ट्रवादी आणि कलाटे यांच्या अस्तित्वाची लढाई आहे.

राज्यातील सर्वाधिक मतदारसंख्या असलेल्या चिंचवड विधानसभा मतदारसंघाची २००९ मध्ये निर्मिती झाली. तेव्हापासून जगताप कुटुंबाचे या मतदारसंघावर वर्चस्व राहिले. एकदा अपक्ष आणि दोन वेळा भाजपच्या चिन्हावर असे तीन वेळा लक्ष्मण जगताप निवडून आले होते. २०१९ मध्ये राष्ट्रवादी-काँग्रेसच्या पाठिंब्यावर अपक्ष लढलेले राहुल कलाटे यांनी कडवी झुंज दिली. दुरंगी लढतीत जगतापांचा निसटता विजय झाला. जानेवारी २०२३ मध्ये जगतापांचे निधन झाले. त्यानंतर झालेल्या पोटनिवडणुकीच्या उमेदवारीसाठी त्यांच्या पत्नी अश्विनी आणि बंधू शंकर यांच्यात संघर्ष झाला. परंतु, भाजप नेतृत्वाने अश्विनी यांना उमेदवारी दिली. कलाटे यांनी बंडखोरी केल्याने तिरंगी लढत झाली आणि जगताप ३६ हजारांनी विजयी झाल्या. महाविकास आघाडीतील बंडखोरी आणि सहानुभूती जगताप यांच्या पथ्यावर पडली.

Pimpri : हिंजवडी आयटीपार्कमधून उद्योग बाहेर का गेले? शरद पवार यांनी सांगितले नेमके कारण, म्हणाले…

त्यानंतर जगताप दीर-भावजयीमधील संघर्षात वाढ झाली होती. मात्र, त्यांच्यात समेट घडवून आणला गेला. अश्विनी यांनी माघार घेतल्याने शंकर यांना उमेदवारी मिळाली. कुटुंबातील संघर्ष मिटल्यानंतर पक्षातील नाराज, स्पर्धकांनी आव्हान दिले. घराणेशाहीवरून आरोप केले. परंतु, या नाराजांचे नेतृत्व करणाऱ्या शत्रुघ्न काटे यांना पक्षाचे शहर कार्यकारी अध्यक्ष आणि चंद्रकांत नखाते यांचे नातलग राज तापकीर यांना युवा मोर्चाचे शहराध्यक्ष केले गेले. त्यानंतर नाराज थंड होऊन जगताप यांच्या प्रचारात सक्रिय झाले. भाजप उमेदवाराचा प्रचार करणार नसल्याचा इशारा देणारे राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाचे नगरसेवक आणि उमेदवारीसाठी शिवसेना (ठाकरे) पक्षात गेलेले माजी नगरसेवक मोरेश्वर भोंडवे यांनीही जगताप यांना पाठिंबा दिला आहे. त्यामुळे जगताप यांची ताकद वाढल्याचे दिसते.

जगताप मतदारसंघातील प्रलंबित प्रश्न सोडविण्याची ग्वाही देत आहेत, मात्र १५ वर्षे घरात आमदारकी असताना प्रश्न का सुटले नाहीत, यावरून विरोधक त्यांना घेरत आहेत. अपुऱ्या पाणीपुरवठ्याच्या तक्रारीचा त्यांना सामना करावा लागत आहे. पिंपळे गुरव, पिंपळे सौदागर, नवी व जुनी सांगवी हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. या भागातील मतांवर त्यांची मोठी मदार असेल. घराणेशाहीवरून होणारे आरोप, जनसंपर्काचा अभाव, माजी नगरसेवकांचेही दूरध्वनी न स्वीकारणे हे जगताप यांच्यासाठी अडचणीचे ठरत असून, बालेकिल्ला राखण्याचे आव्हान त्यांच्यासमोर आहे.

एकदा शिवसेना, तर दोनदा अपक्ष म्हणून निवडणूक लढविलेले राहुल कलाटे आता राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाकडून रिंगणात उतरले आहेत. तीन वेळा अपयश आल्यानंतर कलाटे चौथ्यांदा नशीब आजमावत आहेत. राष्ट्रवादीच्या उमेदवारीसाठी कलाटे आणि पोटनिवडणुकीत एक लाख मते घेतलेले नाना काटे यांच्यात रस्सीखेच होती. मात्र, खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी मित्र कलाटे यांच्या पारड्यात वजन टाकले. उमेदवारी न मिळाल्याने काटे यांनी जगताप यांना पाठिंबा जाहीर केला. चिंचवडमधील राष्ट्रवादीचे बहुतांश माजी नगरसेवक अजित पवारांसोबत आहेत. शिवसेना (ठाकरे) पक्षाचे चिंचवड विधानसभा प्रमुख अनंत कोऱ्हाळे हे अपक्ष भाऊसाहेब भोईर यांचा प्रचार करत असून, महाविकास आघाडीत फूट पडली आहे. प्रत्येक वेळी कलाटे यांनाच उमेदवारी कशासाठी, असा सवाल करून अनेकजण त्यांच्यापासून दूर गेले आहेत. वंचित बहुजन आघाडीनेही या वेळी कलाटे यांना पाठिंबा दिलेला नाही. कलाटे यांची वाकड, पुनावळे भागात ताकद आहे. तर, अपक्ष लढत असलेले भोईर यांचे चिंचवडगाव परिसरात वर्चस्व आहे. कष्टकरी, कामगार, मध्यमवर्गीय, उच्चभ्रू असा संमिश्र मतदार येथे आहे. वाकड, पुनावळे, किवळे, रावेत, पिंपळे सौदागर या भागात नागरीकरण वाढल्याने दीड लाख नवीन मतदारांची भर पडली आहे. या भागातील नागरिकांचा कौल कोणाच्या पारड्यात पडतो, यावर विजयाचे गणित अवलंबून असेल.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply