Pimpri : चिंचवड शहरातील भाजपमधील गटबाजी उघड; इच्छुकांना डावलत विधानसभा उमेदवारीसाठी ‘या’ तिघांची नावे प्रदेशकडे

Pimpri : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी चिंचवड विधानसभा मतदार संघातून उमेदवार कोण असावा, याबाबत पदाधिकाऱ्यांची मते जाणून घेण्यासाठी भाजपने बोलविलेल्या बैठकीला इच्छुकांनाच डावलण्यात आले. आपल्या नावाला विराेध हाेऊ नये, यासाठी भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी पक्ष निरीक्षकांच्या बैठकीचे निमंत्रण दिले नसल्याचा आरोप इच्छुकांनी केला. त्यामुळे चिंचवड भाजपमधील गटबाजी पुन्हा एकदा उफाळून आली.

चिंचवड विधानसभा मतदार संघात उमेदवार काेण पाहिजे, याबाबत पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची मते जाणून घेण्यासाठी काळेवाडीत मंगळवारी भाजपचे प्रवासी प्रभारी नेते प्रदीपसिंग जडेजा यांच्या उपस्थितीत बैठक झाली. बैठकीसाठी निरीक्षक म्हणून पुण्याचे माजी आमदार जगदीश मुळीक उपस्थित होते. चिंचवड विधानसभा मतदार संघातील संघटनेचे आणि शहरातील प्रदेशवर कार्यकारिणीवर असलेल्या पदाधिकारी यांना बैठकीचे निमंत्रण देणे अपेक्षित हाेते. मात्र, निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असलेले माजी नगरसेवक शीतल शिंदे, चंद्रकांत नखाते, शत्रुघ्न काटे यांना निमंत्रण देण्यात आले नव्हते.

उमेदवारीसाठी भाजपमध्ये माेठी रस्सीखेच सुरू आहे. आमदार अश्विनी जगताप आणि शंकर जगताप या दीर भावजयमध्ये उमेदवारीसाठी गृहकलह निर्माण झाला आहे. त्यातच माजी नगरसेवकांनी जगताप कुटुंबाला विराेध करत उमेदवारीवर दावेदारी सांगितली. त्यामुळे भाजपमध्ये गटबाजी उफाळली आहे. दरम्यान, शहराध्यक्ष शंकर जगताप यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही.

Pimpri Chinchwad : पिंपरी चिंचवडमध्ये मोठी दुर्घटना, बावधन परिसरात हेलिकॉप्टर कोसळलं; तिघांचा मृत्यू

उमेदवारीसाठी तीन नावे

उपस्थित पदाधिकाऱ्यांकडून तीन इच्छुकांची बंद लिफाफ्यात नावे देण्यात आली आहेत. त्यामध्ये पहिल्या क्रमांकावर शहराध्यक्ष शंकर जगताप, आमदार अश्विनी जगताप आणि तिसऱ्या क्रमांकावर विधानसभा निवडणूक प्रमुख काळूराम बारणे यांचे नावे दिल्याचे भाजपमधील अधिकृत सूत्रांनी सांगितले.

निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असून संघटनेचा शहर सरचिटणीस आहे. माजी नगरसेवक असतानाही बैठकीचे निमंत्रण दिले नव्हते. याबाबत निरीक्षकांकडे तक्रार केली असल्याचे माजी नगरसेवक शीतल शिंदे यांनी सांगितले. तर, भाजप शहराध्यक्ष मनमानी कारभार करत असून पक्ष त्यांचा घरचा असल्यासारखा चालवत आहेत. त्यांच्या जवळच्या लाेकांना बाेलावून स्वतःचे नाव लिहून घेतले आहे. याबाबत प्रदेशच्या वरिष्ठांकडे तक्रार करणार असल्याचे प्रदेश सदस्य चंद्रकांत नखाते यांनी सांगितले.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply