Pimpari : खड्डेमय उद्योगनगरीची ‘रस्तामुक्त’ फरफट! ‘खड्डेच खड्डे चोहीकडे, गेला रस्ता कुणीकडे’

Pimpari : पाऊस आणि रस्त्यांवरील खड्डे हे जणू समीकरणच बनले आहे. स्मार्ट सिटी अशी ओळख असलेल्या पिंपरी-चिंचवड शहरातील रस्त्यांची पावसामुळे चाळण झाली आहे. रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले असून, संपूर्ण शहर खड्डेमय झाले आहे. ‘खड्डेच खड्डे चोहीकडे, गेला रस्ता कुणीकडे,’ अशीच शहरातील रस्त्यांची अवस्था आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात पक्के, कच्चे असे २०७३ किलोमीटर अंतराचे रस्ते आहेत. पवना नदीवर १४, मुळा नदीवर १०, तर इंद्रायणी नदीवर चार पूल आहेत. शिवाय १७ उड्डाणपूल, १८ भुयारी मार्ग, १० समतल विलगक आणि चार पादचारी भुयारी मार्ग आहेत. प्रत्येक प्राण्याच्या शरीरात रक्तवाहिन्यांना जेवढे महत्त्व असते, तेवढेच महत्त्व शहरांमध्ये रस्त्यांना असते. शहराकडे येणारे आणि शहरातील रस्ते कसे आहेत, यावर त्या शहराचा विकास अवलंबून असतो. मात्र, शहरातील रस्त्यांवर दर वर्षी खड्डे पडतात. शहराच्या मध्यवर्ती भागातील प्रमुख व अंतर्गत रस्त्यांसह उपनगरांमधील रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. पिंपरी, चिंचवड, आकुर्डी, चिखली, निगडी, भोसरी, चऱ्होली, तळवडे, ताथवडे, वाकड, सांगवी यांसह शहराच्या वेगवेगळ्या भागांतील रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. लगतच्या हिंजवडी माहिती-तंत्रज्ञाननगरीतील रस्त्यांवरही खड्डेच खड्डे आहेत. वाकडमधून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरदेखील खड्डे आहेत.

खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचल्याने आणि त्याभोवती खडी, माती आल्याने दुचाकी अपघातांच्या घटना घडत आहेत. प्रमुख रस्त्यांसह अंतर्गत रस्त्यांवरही खड्डे तयार झाल्याने वाहनचालक त्रस्त झाले आहेत. काही रस्त्यांत तर इतके खड्डे पडले आहेत, की रस्त्यात खड्डे आहेत, की खड्ड्यात रस्ता हेच समजत नाही. रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य असल्याने वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागते. अगदी जीव मुठीत घेऊन वाहनचालक खड्डेयुक्त रस्त्यांवरून गाडी चालवत असतात. रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे झालेल्या अपघातांत काही वेळा जीवितहानीदेखील झालेली आहे.

Pune : कामशेतमधील आदिवासी पाड्यावरील चिमुरड्यांसाठी ‘ससून’ बनले ‘माय’!

महापालिका रस्त्यांवर मोठा खर्च करते. रस्ताबांधणी आणि दुरुस्तीसाठीही कोट्यवधींचा खर्च केला जातो. मग प्रश्न पडतो, की इतका पैसा खर्च करूनही रस्त्यावरील खड्डे कायमचे नाहीसे का होत नाहीत? शहर खड्डेमुक्त का होत नाही? महापालिकेकडून दर वर्षी पावसाळ्यापूर्वी खड्डे बुजविल्याचे दावे केले जातात. प्रत्यक्षात थोडा पाऊस झाला, की रस्त्याची चाळण होण्यास सुरुवात होते. रस्तेखोदाईस १५ मेनंतर परवानगी दिली जात नसल्याचे सांगितले जाते. मात्र, अत्यावश्यक कामांच्या नावाखाली पावसाळ्यात बिनधास्तपणे खोदाई सुरू असते. सध्या तर महापालिकेच्या मुख्यालयासमोरच खोदाई सुरू आहे. अगोदरच खड्ड्यांमुळे वाहनचालक त्रस्त असताना त्यात खोदाईमुळे अरुंद झालेल्या रस्त्यांची भर पडते. परिणामी, गेल्या काही दिवसांपासून शहरातील विविध भागांत सातत्याने प्रचंड वाहतूककोंडी होत आहे.

…तरच शहर खड्डेमुक्त होईल!

ज्या रस्त्यांवर खड्डे पडले आहेत, त्या रस्त्याच्या ठेकेदारावर कारवाई व्हायला हवी. त्या ठेकेदाराला काळ्या यादीत टाकले पाहिजे. तसेच त्या ठेकेदाराला गुणवत्तापूर्ण काम केल्याचे प्रमाणपत्र देणाऱ्या अधिकाऱ्यांवरदेखील कठोर कारवाई व्हायला हवी. तरच पिंपरी-चिंचवड शहर खड्डेमुक्त होईल.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply