Pataleshwar Caves : पुणे परिसर दर्शन : अखंड पाषाणात खोदलेली पाताळेश्वर लेणी

Pataleshwar Caves : पेशवाईत पुणे वाढताना जवळच नदीपलीकडे भांबवडे हे छोटे गाव होते. याची पाटिलकी शिरोळे घराण्याकडे होती. या गावालगत एक खडकाळ टेकडी होती. त्याच्याजवळ एक जुनी लेणी आणि त्यात खोदलेले एक महादेवाचे दुर्लक्षित मंदिर होते. इ. स. १७७३ मधील सवाई माधवराव यांच्या जन्मावेळीदेखील याची नोंद नव्हती. सन १८१० मध्ये दुसऱ्या बाजीरावांनी एक रुपया भुयारातील महादेवापुढे ठेवला, अशी नोंद होती.

भांबवडेतील रोकडोबा मंदिर, वृद्धेश्वर आणि त्र्यंबकेश्वर ही देवळे प्रामुख्याने नोंदवलेली आढळतात, पण या पाताळेश्वर ऊर्फ पांचाळेश्वरच्या नशिबी उपेक्षाच होती. वास्तविक ही पाताळेश्वर लेणी सहाव्या ते आठव्या शतकामध्ये राष्ट्रकुटांच्या कारकिर्दीत खोदली गेली. ही लेणी भव्य काळ्या पाषाणात एकसंधपणे खोदलेली आहे. लेणीसमोर नंदी मंडपसुद्धा पाषाणात खोदलेला आहे. मोठे दगडी खांब कोरले आहेत; पण ते नुसते चौकोनी आहेत, त्यावर नक्षीकाम नाही, यावरून लेणी बरीच पुरातन असावी असे वाटते. शंकराची पिंड, शेजारी गणपती आणि दुसऱ्या बाजूला चतुर्भुज देवी अशी मंदिरे आहेत. मंदिरांना पूर्ण प्रदक्षिणा मार्ग खोदला आहे.
 
गुहा प्रशस्त असून त्याच्या सज्जामध्ये कडेला मूर्ती खोदण्याचा प्रयत्न केलेला दिसतो. पुढे १८५७ च्या बंडानंतर इथे एक बाबा बसायला लागले. पाताळेश्वराच्या शेजारील टेकडीवर त्यांचे वास्तव्य होते. या बाबांचे बालपण सोलापूरजवळ होनमुर्गी या खेड्यात गेले. जंगलात राहायचे म्हणून त्यांना ‘जंगली महाराज’ असे नाव लोकांनी दिले. १८९० दरम्यान त्यांचे निधन झाले. भक्तांनी त्या टेकडीवर त्यांचे मंदिर बांधले. त्यामुळे या भागात वर्दळ वाढली अन् पातळेश्वरचेही नशीब उजाडले. लेणीत उतरून जावे लागत असल्यामुळे याला पाताळेश्वर म्हणत असावेत. या भागात संभाजी उद्यान तयार झाले आणि १९७६ दरम्यान मोठा डांबरी रस्ता तयार झाला.
 
कसे जाल?

शिवाजीनगर भागात ‘जंगली महाराज मंदिर’ आणि ‘पाताळेश्वर लेणी मंदिर’ प्रसिद्ध आहे.

काय पहाल?

अखंड पाषाणात खोदलेले लेणे, नंदी मंडपात विराजमान झालेला नंदी, प्रशस्त गुहा, मोठे चौकोनी खांब, शिवमंदिर आणि जंगली महाराजांचे टुमदार कौलारू मंदिर.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply