Pandharpur Wari 2023 : पालखी साेहळ्यानिमित्त पुण्यात वाहतुकीत बदल; कोणते रस्ते सुरु, कोणते बंद? लाईव्ह लोकेशनची सुविधा

Pune : संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू श्री तुकाराम महाराज यांची पालखी आज पुणे शहरात दाखल होणार आहे. दोन दिवस पालखी याच ठिकाणी मुक्काम करून नंतर शहराला निरोप देईल. त्यामुळे या पालखी साेहळ्यानिमित्त वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत. 

शहरातील प्रमुख रस्ते वाहतुकीस बंद ठेवण्यात येणार आहे. त्या रस्त्यांसाठी पर्यायी रस्ते सुचवण्यात आले आहेत. पालखी सोहळ्यात वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पोलिसांकडून यंदा लाइव्ह लोकेशन सुविधेचा वापर करण्यात येणार आहे.

श्री ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू श्री तुकाराम महाराज यांच्या पालखीचे आगमन होताच तसेच पालखी मार्गस्थ होत असताना शहरातील मुख्य रस्ते बंद करण्यात येतात.वाहनचालकांची गैरसोय टाळण्यासाठी पालखी मार्गावरील प्रमुख चौक आणि रस्ते टप्प्याटप्प्याने वाहतुकीस बंद करण्यात येणार आहे. 

यंदा लाइव्ह लोकेशन सुविधेमुळे पालखी सोहळ्याची माहिती नागरिकांना उपलब्ध होईल,तसेच वाहतुकीचे नियोजनही करणे शक्य होणार आहे. diversion.punepolice.gov.in या लाइव्ह लोकेशनमुळे रस्ते खूप वेळ बंद राहणार नाहीत. पालखी मार्गांवर सीसीटीव्ही कॅमेरे, ड्रोन कॅमेऱ्यांद्वारे लक्ष ठेवण्यात येणार आहे.पालखी सोहळ्यातील भाविकांच्या गर्दीचे नियोजन,अनुचित घटना रोखण्यासाठी बंदोबस्ताची आखणी करण्यात आली आहे.

वाहतुकीस बंद असणारे रस्ते- कंसात पर्यायी मार्ग

गणेशखिंड रस्ता (रेंजहिल्स चौक ते संचेती रुग्णालय) पर्यायी मार्ग- रेंजहिल्स-खडकी पोलीस ठाणे, पोल्ट्री चौक, जुना मुंबई-पुणे महामार्ग आणि रेंजहिल्स, सेनापती बापट रस्ता, विधी महाविद्यालय रस्ता.

फर्ग्युसन रस्ता (खंडुजीबाबा चौक ते वीर चापेकर चौक) पर्यायी मार्ग- कर्वे रस्ता, सेनापती बापट रस्ता, रेंजहिल्स.

शिवाजी रस्ता (गाडगीळ पुतळा ते स. गो. बर्वे चौक) पर्यायी मार्ग- कुंभार वेस, मालधक्का चौक, आरटीओ चौक, जहांगीर हॉस्पिटल, बंडगार्डन रस्ता.

टिळक चौक ते वीर चापेकर चौक, पर्यायी मार्ग- शास्त्री रस्ता, म्हात्रे पूल.

लक्ष्मी रस्ता (बेलबाग चौक ते टिळक चौक), पर्यायी मार्ग- शिवाजी रस्ता, हिराबाग टिळक रस्ता, शास्त्री रस्ता.

पालख्यांचे आज पुण्यात आगमन

संत श्री ज्ञानेश्वर महाराज आणि संत श्री तुकाराम महाराज यांच्या पालख्यांचे आज पुण्यात आगमन होणार आहे. संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचा मुक्काम श्री पालखी विठ्ठल मंदिर (भवानी पेठ), तर संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचा मुक्काम श्री निवडुंगा विठोबा मंदिरात (नाना पेठ) येथे असेल.

दोन्ही मंदिरांमध्ये यासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. सायंकाळी मंदिरांमध्ये पालखीचे आगमन झाल्यावर अभिषेक, पादुका पूजन आणि आरतीने पालख्यांचे स्वागत होणार आहे.त्यानंतर रात्रभर भाविकांना पादुकांचे दर्शन घेता येणार आहे. दोन्ही मंदिरांमध्ये उत्सव मंडपाच्या उभारणीसह विद्युत रोषणाई आणि फुलांची सजावट करण्यात आली आहे.

 


मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply