Palkhi Sohala : पालख्यांचे आगमनाने भक्तिसागरात पुण्यनगरी झाली चिंब

पुणे - पावसाने दिलेली ओढ अन्‌ उन्हामुळे जिवाची काहिली होत असतानाही, विठुमाऊलीच्या भेटीच्या ओढीने निघालेल्या लाखो वैष्णवजणांचा मेळा संत तुकाराम महाराज व संत ज्ञानेश्‍वर महाराजांच्या पालखीबरोबर सोमवारी पुण्यभूमीत दाखल झाला. कित्येक तास रस्त्यावर उभे राहून त्या एका क्षणाची आतुरतेने वाट पाहणाऱ्या लाखो पुणेकरांनी त्रिवेणी संगमाची ‘याची देही याची डोळा’ अनुभूती घेत हा क्षण हृदयात साठविला. प्रथेप्रमाणे पुणेकरांनी पालख्यांचे मोठ्या आनंदोत्सवात स्वागत तर केलेच, शिवाय आपल्या दारी आलेल्या वारकऱ्यांच्या पाहूणचाराला तितक्‍याच आनंदाने सुरुवात केली.

संत तुकाराम महाराज व संत ज्ञानेश्‍वर महाराज पालखी सोहळ्यासाठी पुणेकरांकडून दरवर्षी मोठी जय्यत तयारी केली जाते. रांगोळ्यांच्या पायघड्यांपासून कमालीची स्वच्छता, वारकऱ्यांना मुक्कामासाठीची व्यवस्था, खाण्या-पिण्यासाठी नानाविध जिन्नसपासून ते त्यांचे ऊन, वारा, पावसापासून संरक्षण करण्यासाठी छत्री, रेनकोट यांसारख्या किती तरी वस्तु देण्यासाठीची ही तयारी होती. आळंदीहून प्रस्थान ठेवल्यानंतर संत ज्ञानेश्‍वर महाराज यांची पालखी सोमवारी दुपारी १२ वाजून २० मिनीटांनी पुणे शहरात आळंदी रस्त्यावरील कळस येथे दाखल झाली.

तर संत तुकाराम महाराज पालखी नेहमीप्रमाणे दुपारी एक वाजून १५ मिनिटांनी बोपोडी येथे दाखल झाली. पुणे महापालिकेचे आयुक्त विक्रम कुमार यांनी दोन्ही पालखी सोहळ्याचे सन्मानपूर्वक स्वागत केले. विक्रम कुमार यांनी वारकऱ्यांना श्रीफळ व गुलाबपुष्प देऊन स्वागत केले. यावेळी पोलिस सहआयुक्त संदीप कर्णिक यांच्यासह अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमनार, रवींद्र बिनवडे, उपायुक्त माधव जगताप, संतोष वारुळे, किशोरी वारुळे आदी उपस्थित होते.

भगवा ध्वज हाती घेऊन दिंड्यांपुढे चालणाऱ्या लाखो वारकऱ्यांच्या सानिध्यात संत ज्ञानेश्‍वर महाराज पालखी सोहळा दुपारी फुलेनगर येथे भोजनासाठी थांबला. त्यानंतर दुपारी एक वाजता संगमवाडी येथे विसावा घेतल्यानंतर पालखीने पुढे प्रस्थान ठेवले. त्याचवेळी संत तुकाराम महाराज पालखीचे कासारवाडी येथे दुपारचे जेवण झाले. त्यानंतर वाकडेवाडीत दुपारी साडेचार वाजता पालखी विसाव्यासाठी थांबली.

सायंकाळी सहा वाजता तुकाराम महाराज पालखीचे शिवाजीनगर येथे आगमन झाले. त्यापाठोपाठ संत ज्ञानेश्‍वर महाराज पालखी सोहळाही तेथे दाखल झाला. यावेळी पुणेकरांनी शिवाजीनगर येथे मोठ्या संख्येने गर्दी केली होती. लाखो भाविकांनी पालखीचे दर्शन घेण्यासाठी अक्षरशः गर्दी केली होती. लहान मुले, वृद्ध, महिला पालखीतील पादुकांवर डोके ठेवून आशीर्वाद घेत होते. दोन्ही पालख्यांचे जंगली महाराज रस्त्यावर आगमन झाले.

संत ज्ञानेश्‍वर महाराज पालखी व संत तुकाराम महाराज पालखी पादुका चौकात आल्यानंतर प्रथेप्रमाणे पालखी थांबवून आरती करण्यात आली. त्यानंतर भाविकांच्या भक्तीसागरात पालख्यांनी पुढे प्रस्थान ठेवले. जंगली महाराज रस्ता, खंडुजीबाबा चौक, लक्ष्मी रस्त्याने संत तुकाराम महाराज पालखी नाना पेठेतील निवडुंगा विठ्ठल मंदिरात आली. त्यापाठोपाठ संत ज्ञानेश्‍वर महाराजांची पालखी भवानी पेठेतील पालखी विठोबा मंदिरामध्ये आली. दोन्ही पालख्यांचे मंदिरात आगमन झाल्यानंतर लाखो भाविकांच्या उपस्थितीत समाजआरती झाली. त्यानंतर हा पालखी सोहळा दोन दिवसांच्या मुक्कामासाठी पुण्यात विसावला.

 


मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply