Palkhi Sohala : पालखीच्या आगमनानिमित्त पुणे शहरात वाहतुकीत केले असे बदल

पुणे - संत श्री तुकाराम महाराज आणि संत श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालख्या पुणे शहरात १२ जून रोजी एकत्रित येत आहेत. या दोन्ही पालख्यांच्या आगमनामुळे शहरात रस्त्यावर होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पालखी मार्ग आणि परिसरातील वाहतुकीमध्ये आवश्यकतेनुसार तात्पुरत्या स्वरुपात बदल करण्यात येणार आहेत. शहरातील काही मार्ग पहाटे दोन वाजल्यापासून वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार आहेत.

तसेच, पालखीदरम्यान मुंबई, सोलापूर आणि अहमदनगर दिशेने शहरात येणाऱ्या सर्व जड वाहनांना बंदी राहील. पालखी पुढे जाईल, त्यानुसार वाहतूक टप्प्याटप्प्याने सुरु करण्यात येणार आहे. वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करुन पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन वाहतूक शाखेचे उपायुक्त विजयकुमार मगर यांनी केले आहे.

पालखी सोहळ्यातील काही वाहनांवर जीपीएस प्रणाली बसविण्यात येणार आहे. त्यामुळे पालखीचे ‘लाइव्ह लोकेशन’ कळणार असून, त्यानुसार वाहतूक नियंत्रित करण्यात मदत होणार आहे.

- पालखी सोहळ्यासाठी स्वतंत्र ॲप.

- सीसीटीव्हीद्वारे वाहतुकीवर ‘वॉच’

- दिंडीत अंतर पडल्यास रस्त्याच्या दोन्ही बाजूचे बॅरिकेड॒स किंवा रोप काढून वाहनांना मार्ग खुला करून देणार.

- पालखी मार्गावरील मेट्रोची कामे बंद ठेवण्यात येणार आहेत.

सुमारे एक हजार वाहतूक पोलिस तैनात

पालखी सोहळ्यादरम्यान शहरात वाहतूक नियमनासाठी पोलिस उपायुक्त, चार सहायक पोलिस आयुक्त यांच्यासह ९७५ पोलिस निरीक्षक आणि कर्मचारी तैनात असतील, अशी माहिती पोलिस उपायुक्त विजयकुमार मगर यांनी दिली.

संत तुकाराम महाराज पालखी आगमन मार्ग -

संत श्री तुकाराम महाराज पालखी मार्ग : १२ जून रोजी रोजी विठ्ठल मंदिर आकुर्डी येथून निघून चिंचवड, पिंपरी, वल्लभनगर नाशिक फाटा, फुगेवाडी, दापोडी, हॅरिस ब्रिज, बोपोडी चौक, खडकी रेल्वे स्टेशन, मरिआई गेट चौक, वाकडेवाडी पाटील इस्टेट चौक, इंजिनिअरिंग कॉलेज चौक.

वाहतुकीसाठी बंद रस्ते आणि कंसात वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग -

  • बोपोडी चौक ते खडकी बाजार (अंतर्गत रस्त्याने चर्च चौक).

  • चर्च चौक (भाऊ पाटील रोड ब्रेमेन चौक औंधमार्गे).

  • पोल्ट्री फार्म चौक (रेल्वे पोलिस मुख्यालयासमोरून औंध रस्ता ब्रेमेन चौक).

  • मुळा रोड ते कमल नयन बजाज उद्यान चौक (अंतर्गत रस्त्याचा वापर करावा).

  • चर्च चौक ते इंजिनिअरिंग कॉलेज चौक- जुना मुंबई-पुणे मार्गावरून पुण्याकडे येणारी सर्व वाहने बंद करण्यात येतील (बोपोडी चौकातून पुणे-मुंबईकडे जाणाऱ्या वाहनांनी भाऊ पाटील रस्त्यावरून औंध रस्तामार्गे ब्रेमेन चौकातून इच्छितस्थळी जावे).

  • आर.टी.ओ. ते इंजिनिअरिंग कॉलेज चौक (आरटीओ चौक - शाहीर अमर शेख चौक - कुंभार वेस चौक किंवा आरटीओ चौक- जहाँगीर चौक आंबेडकर सेतू ते गुंजनमार्गे).

  • सादलबाबा दर्गा ते पाटील इस्टेट चौक (पर्णकुटी चौक-बंडगार्डन पूल-महात्मा गांधी चौकमार्गे).

संत ज्ञानेश्वर महाराज पालखी आगमन मार्ग -

श्री क्षेत्र आळंदी येथून पालखी १२ जून रोजी निघून वडमुखवाडी चऱ्होली फाटा, दिघी मॅगझीन, बोपखेल फाटा. बी.ई.जी. ट्रेनिंग बटालियन २, म्हस्के वस्ती कळस ओढा, विश्रांतवाडी, फुलेनगर, साप्रस चौकी, चंद्रमा चौक, डावीकडे वळून सादलबाबा चौक, उजवीकडे वळून संगमवाडी रस्त्याने पाटील इस्टेट चौक, डावीकडे वळून इंजिनिअरिंग कॉलेज चौक.

वाहतुकीसाठी बंद रस्ते आणि कंसात वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग -

  • कळस फाटा से बोपखेल फाटा, विश्रांतवाडी चौक (धानोरी आणि अंतर्गत रस्त्याने).

  • मेंटल हॉस्पिटल कॉर्नर ते आळंदी रोड जंक्शन (जेल रोड- विमानतळ रोड मार्ग).

  • सादलबाबा दर्गा ते पाटील इस्टेट रस्ता (पर्णकुटी चौक -गुंजन चौक -जेल रोड- विश्रांतवाडी चौक).चंद्रमा चौक ते आळंदी रोड (अंतर्गत रस्त्यांचा वापर करावा).

  • नवीन आंबेडकर सेतू ते चंद्रमा चौक बंद. होळकर पूल ते चंद्रमा चौक आणि होळकर पूल ते साप्रस चौकी मार्ग बंद.

  • या कालावधीत फक्त आळंदीकडे जाणारे रस्ते बंद राहणार असून, इतर रस्ते वाहतुकीसाठी सुरू राहतील.

संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज पालख्यांचे एकत्रित मार्ग -

पुणे-मुंबई रस्त्याने इंजिनिअरिंग कॉलेज चौक, संचेती चौक, सिमला ऑफीस चौक, वीर चाफेकर चौक, ज्ञानेश्वर पादुका चौक, तुकाराम पादुका चौक, गुडलक चौक, खंडोजीबाबा चौक, टिळक चौक, लक्ष्मी रस्त्याने विजय टॉकीज चौक, सेवासदन चौक, बेलबाग चौक, बुधवार चौक, पासोड्या विठोबा मंदिर, मोती चौक, सोन्या मारुती चौक, हमजेखान चौक, डुल्या मारुती चौक, नानापेठ पोलिस चौकी येथे आल्यानंतर संत तुकाराम महाराजाची पालखी अरुणा चौकमार्गे निवडुंगा विठोबा मंदिरात मुक्काम करेल. तसेच, संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी अशोक चौकमार्गे पालखी विठोबा मंदिरात मुक्काम करेल. दुपारी १२ वाजल्यापासून आवश्यकतेनुसार वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार असून वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा.

वाहतुकीसाठी बंद रस्ते आणि कंसात वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग -

  • गणेश खिंड रस्ता- रेंजहिल चौक ते संचेती चौक- (रेंज हिल्स- खडकी पोलिस ठाणे अंडरपास- पोल्ट्री चौक- जुना मुंबई-पुणे महामार्ग किंवा रेंज हिल्स- सेनापती बापट रस्ता- नळ स्टॉप चौक).

  • फर्ग्युसन रस्ता- खंडोजीबाबा चौक ते वीर चाफेकर चौक (खंडोजीबाबा चौक- कर्वे रस्ता- सेनापती बापट रस्ता).

  • शिवाजी रस्ता- गाडगीळ पुतळा ते स. गो. बर्वे मार्ग (गाडगीळ पुतळा - कुंभारवेस चौक-आरटीओ चौक).

  • वीर चाफेकर चौक ते वाकडेवाडी भुयारी मार्ग (पोल्ट्री फार्म चौक, रेंजहिल मार्ग किंवा औंध मार्ग).

  • मॉडर्न कॉलेज रस्ता- डेक्कन वाहतूक विभाग ते थोपटे पथ चौक (घोले रोड व आपटे रोड).

  • कुंभार वेस चौक ते गाडगीळ पुतळा चौक आणि मालधक्का ते शाहीर अमर शेख चौक (कुंभार वेस- पवळे चौक- फडके हौद चौक किंवा मालधक्का चौक- नरपतगीर चौक- १५ ऑगस्ट चौक - कमला नेहरू रुग्णालय).

  • - वारकऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी रस्त्याच्या दोन्ही बाजूस १०० मीटरपर्यंत वाहने उभी करण्यास प्रतिबंध.

  • - अरूणा चौक ते पारशी अगेरी आणि पालखी विठोबा चौक ते बाबासाहेब किराड पथ जंक्शन या रस्त्यांवर सर्व प्रकारच्या वाहनांना ये-जा करण्यास व पार्किंग करण्यास बंदी.

पालखीच्या दिंड्यांसोबत येणाऱ्या वाहनांसाठी पर्यायी मार्ग -

१२ जून रोजी आळंदीकडून विश्रांतवाडीपर्यंत येणाऱ्या वाहनांनी आळंदी-मरकळ - तुळापूर - फुलगाव - लोणीकंद - वाघोली- लोहगाव- येरवडा मार्गाचा वापर करावा.

- इंदिरानगर, दत्तमंदिरपासून मरिआई गेटकडे जाणाऱ्या वाहनांनी साप्रस चौकी जंक्शन-चंद्रमा चौक-सादलबाबा दर्गा- पर्णकुटी चौक या मार्गाचा वापर करावा.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply