Pahalgam Attack : आमच्या नावाखाली दहशतवाद नको; नागरिकांचा दहशतवाद्यांना इशारा; हल्ल्याच्या निषेधार्थ बंद..

Srinagar : पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर बुधवारी काश्‍मीर खोऱ्यात सर्व सामान्य नागरिकांनी रस्त्यावर उतरून या हल्ल्याचा निषेध केला. ‘‘वेगळ्या काश्‍मीरच्या नावाखाली दहशतवाद पसरविणाऱ्या पाकिस्तानच्या दहशतवाद्यांना ‘आमच्या नावाखाली दहशतवाद माजवू नका,’’ असा इशारा यातून देण्यात आल्याचे मानले जात आहे.

श्रीनगरसह काश्‍मीरमधील विविध ठिकाणी पहलगाम येथे झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ बुधवारी कडकडीत बंद पाळण्यात आला. काश्‍मीर चेंबर आॅफ कॉमर्सच्या वतीने बुधवारी काश्‍मीर बंदची हाक देण्यात आली होती. काश्मीर ट्रेडर्स अँड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन, हॉटेलिअर्स असोसिएशन आणि ट्रान्सपोर्टर्स संघटनांसह समाजातील विविध स्तरांतून ‘बंद’ला चांगला प्रतिसाद मिळाला. नॅशनल कॉन्फरन्स (एनसी), पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी (पीडीपी), पीपल्स कॉन्फरन्स (पीसी) आणि इतर काही संघटनांनीही काश्‍मीर बंदला आपला पाठिंबा जाहीर केला. स्थानिक ज्येष्ठ नागरिकांनी केलेल्या दाव्यानुसार मागील कित्येक वर्षांत पहिल्यांदाच अशा पद्धतीने नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने बंद पाळला आहे.

Pahalgam Terror Hits Tourism : दहशतवादी हल्ल्याचा फटका पर्यटनाला; विमानाच्या तिकीट दरात घसरण, पण श्रीनगरहून परतीचा प्रवास महाग

जम्मू-काश्मीरमधील सर्व स्तरांतील नागरिकांनी या हल्ल्याच्या निषेध केला. ‘‘असे व्हायला नको होते. काश्‍मीरच्या आणि इस्लामच्या नावाखाली हल्ले करणे चुकीचे आहे’’ असे मत हाजी बशीर अहमद दार यांनी व्यक्त केले. ‘‘येथील दहशतवाद संपविण्यासाठी सरकार जे धोरण राबवेल त्यात आम्ही सरकारच्या पाठीशी आहोत,’’ असे मत कुलगाम येथील फळउत्पादक जी. एम. बांडे यांनी व्यक्त केले. दरम्यान, जम्मू-काश्‍मीरमधील शैक्षणिक संस्थांनीदेखील बंदला पाठिंबा दिला होता.

जम्मू-काश्‍मीरच्या अर्थव्यवस्थेवर घाला घालण्यासाठीच हा हल्ला करण्यात आला आहे. स्थानिक अर्थव्यवस्था ही पर्यटनावर अवलंबून असल्यानेच पर्यटकांना जाणीवपूर्वक लक्ष्य करण्यात आले. येथील पर्यटकांची संख्या घटली, तर त्याचा परिणाम थेट स्थानिक अर्थव्यवस्थेवर होईल.

- महंमद इक्बाल, कुलगाम येथील व्यावसायिक



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply