Navale Bridge Accident : पुण्याच्या नवले ब्रिजवरील अपघाताची मुख्यमंत्र्यांकडून दखल

Pune Navale Bridge Accident : रविवारी रात्री १० वाजेच्या सुमारास पुण्यात मोठी दुर्घटना घडली. नवले पूलावर कंटेनरचा ब्रेक फेल होऊन भीषण अपघात झाला. या अपघातात ६ ते १० जण जखमी झाल्याची प्राथामिक माहिती आहे. अपघात इतका भीषण होता, की यात सुमारे २५ ते २६ वाहने एकमेकांवर आदळली. सुदैवाने यामध्ये कुठलीही जीवितहानी झाली नाही. दरम्यान, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या अपघाताची गंभीर दखल घेतली असून चौकशीचे आदेश दिले आहेत.

पुण्यातील नवले पूल येथे अपघाताची मालिका अद्यापही सुरू असून आज पुन्हा कंटेनरचा ब्रेक निकामी झाल्याने अपघात झाला. यात सुमारे 25 ते 26 गाड्या एकमेकावर आदळल्या आणि सुमारे ६ ते १० जण जखमी झाले आहेत. जवळच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघातानंतर कंटेनरमधील ऑईल रस्त्यावर सांडल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत जखमींना रुग्णालयात दाखल केलं.

नेमकं काय घडलं?

साताऱ्याहून मुंबईच्या दिशेने निघालेल्या कंटेनरचा ब्रेक निकामी झाल्याने चालकाचे त्यावरील नियंत्रण सुटले आणि कंटेनर पंचवीस ते तीस गाड्यांना उडवत वाडगाव पुलाजवळ आदळला. यात सुमारे ६ ते १० जण जखमी झाले आहेत. दरम्यान सुमारे १० वाजेच्या सुमारास हा अपघात झाला. अपघाता दरम्यान रस्त्यावर ऑइल सांडल्याने रस्ता अधिकच निसरडा झाला त्यामुळे गाड्यांची संख्या अधिकाधिक वाढत गेली.

मुख्यमंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश

दरम्यान, या अपघाताविषयी मुख्यमंत्र्यांनी पोलिसांकडून माहिती घेतली आहे. हा अपघात कुणाच्या निष्काळजीपणामुळे झाला तेही तपासण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. तसेच अपघातातील जखमींना योग्य ते उपचार मिळण्याची व्यवस्था करण्याच्या सूचना देखील त्यांनी प्रशासनाला दिल्या आहेत. अपघातामुळे या भागात मोठ्या प्रमाणावर झालेली वाहतूक कोंडी दूर करून वाहनधारकांना त्रास होणार नाही हे पाहण्याचे निर्देश देखील त्यांनी दिले आहेत.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply