Nashik Onion Markets Closed : कांदा प्रश्न पेटला, आजपासून नाशिकमधील सर्व बाजारपेठेतील लिलाव बंद; व्यापारी संघटनेचा निर्णय

Nashik Onion Markets Closed: टोमॅटोप्रमाणेच कांद्याचे भाव वाढू नये म्हणून केंद्र सरकारने कांद्याच्या निर्यातीवर ४० टक्के शुल्क लागू केले. यामुळे कांद्याच्या दरात सातत्याने घसरण होत असून कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक झाला आहे. या निर्णयाविरोधात आजपासून म्हणजेच सोमवारपासून नाशिक जिल्ह्यातील सर्व बाजारपेठांमध्ये कांद्याचा लिलाव बंद ठेवण्यात आला आहे. जिल्हा कांदा व्यापारी संघटनेने हा निर्णय घेतला आहे.

त्यामुळे महाराष्ट्रातील सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लासलगाव तसेच नाशिक परिसरातील सर्व कांदा बाजारपेठेतील कांदा खरेदी-विक्री बंद  राहणार आहे. व्यापारी संघटनेच्या या निर्णयामुळे समित्यांमध्ये दैनंदिन होणारे ६० ते ७० हजार क्विंटलचे लिलाव थांबतील. याचा फटका मुख्यत्वे महानगरांना बसण्याची शक्यता आहे.

मागील काही दिवसांपासून कांद्याच्या दरात सातत्याने वाढ होत होती. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण होतं. अशातच कांद्याचे दर नियंत्रणात राहावे, यासाठी केंद्र सरकारने एक्स्पोर्ट ड्युटीत 40 टक्के वाढ केली. त्यामुळे परदेशात जाणारा माल बांग्लादेश सीमा व बंदरात अडकून पडला आहे.

Onion Export Duty : कांद्याच्या निर्यातीवर ४० टक्के शुल्क, केंद्र सरकारच्या निर्णयामुळे कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत

परिणामी कांद्याची निर्यात बंद पडल्याने दर झपाट्याने खाली येण्यास सुरूवात झाली आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांसह व्यापारी संघटनाही आक्रमक झाल्या आहेत. सरकारच्या निर्णयाच्या निषेधार्थ राज्यातील सर्व बाजार समितीच्या सर्व घटकांनी बंद पाळावा, असे आवाहन बाजार समितीचे संचालक व उत्पादकांकडून केले जात आहे.

दरम्यान, सरकारच्या निर्णयात स्पष्टता नाही. मालाचा पुरवठा करता येणार नसेल तर खरेदी का करायची, यावर कांदा उत्पादक शेतकरी आणि व्यापारी संघटनेमध्ये नाशिकमध्ये बैठक झाली. या बैठकीत सोमवारपासून सर्व बाजार समित्यांमध्ये लिलाव बंद ठेवण्याचे निश्चित झाल्याचं सांगण्यात आलं आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply