Nashik News : ब्रिटिशकालीन पुलाचा कोसळला कठडा; मनमाड शहरातील घटना

Nashik News : इंदूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील आणि नागपूर-मुंबई रेल्वेलाइनवरून गेलेला ६१ वर्षे जुना पुलाचा मोठा कठडा कोसळल्याची घटना बुधवारी (ता. २९) पहाटेच्या सुमारास घडली. सुदैवाने या घटनेत कुठलीही जीवितहानी झाली नसली तरी पुलाचा अर्ध्यापेक्षा जास्त भाग खचल्याने शहराची दोन भागात विभागणी झाली तर इंदूर-पुणे महामार्गावरील वाहतूक बंद करण्यात आल्याने वाहनांच्या दुतर्फा रांगा लागल्या.

रेल्वेरूळाच्या थोडा मागे पूल खचल्याने मोठी दुर्घटना टळली. त्यामुळे रेल्वे वाहतूक सुरळीत सुरू आहे. पुलाच्या दुरुस्तीसाठी दीड महिना लागणार असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने सांगण्यात आले.

Mumbai Pune Express Way : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर ३ तासांचा ब्लॉक; या पर्यायी मार्गांचा करा वापर

बुधवारी पहाटे पुलावरून सुरळीत वाहतूक सुरू असताना ही घटना घडली. रस्‍ता खचायला सुरवात झाली तसे वाहनचालक थांबले. पाहता पाहता रस्‍त्याचा एक मोठा भाग खचून केला आणि पुलावरील वाहतूक बंद झाली. सुदैवाने या दुर्घटनेत कुठलीही जीवितहानी अथवा नुकसान झाले नाही. परंतु या घटनेमुळे शहराचे दोन भाग झाले आहे. इंदूरकडून येणारी, तसेच नांदगाव, येवला, चांदवड, मालेगाव या मार्गावरील वाहतुकीला याचा मोठा फटका बसला आहे.

वाहतूक बंद करण्यात आल्याने वाहने जागच्या जागी थांबल्याने मोठ्या रांगा लागल्या होत्या. विशेष म्हणजे या पुलाच्या खालून मुंबई-नागपूर रेल्वेलाइन गेली आहे. ही घटना रूळाच्या मागे घडल्याने मोठी दुर्घटना टळली. शहरातून जाणाऱ्या बस आज गेल्या नाही. प्रवासी वाहतुकीसह इंधन वाहतूक, अत्यावश्यक सेवांची सेवा मनमाड, लासलगाव, विंचूर, येवला, तसेच नांदगाव, राजापूर, नगरसूल, येवला या दोन्ही मार्गाने होऊ शकते.

पुणे मार्ग येणारी वाहतूक येवला येथून, तर इंदूरमार्गे येणारी वाहतूक मालेगाव येथून वळविण्यात आली आहे. तसेच शहरातील नागरिकांना ये-जा करण्यासाठी पर्यायी रस्त्याची व्यवस्था करावी लागणार आहे. सध्या ही वाहतूक आनंदवाडी, कऱ्ही वंजारवाडी रस्ता ते गर्डर शॉपमार्गे शहरात येणाऱ्या रस्त्यावरून सुरू आहे.

शहरातील दोन्ही भागातील नागरिकांना जाण्या-येण्यासाठी  रेल्वेस्थानकावर असलेला पादचारी पूल नागरिकांसाठी खुला करावा लागणार आहे. तरच शहरातील नागरिकांची सोय होऊ शकते. पुलाच्या दुरुस्तीसाठी साधारणतः दीड महिना लागणार असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता विलास पाटील यांनी सांगितले. त्यामुळे सदर पूल दीड महिन्यांसाठी बंद असणार आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply