Nashik Clash : हिंसाचार प्रकरणी नाशिक पोलिसांची मोठी कारवाई, १५०० जणांवर गुन्हा; २५ आरोपी अटकेत

Nashik Clash : नाशिकच्या काठेगल्लीमध्ये असलेली अनधिकृत दर्गा हटवण्यापूर्वी मंगळवारी मध्यरात्री जोरदार राडा झाला होता. ही दर्गा हटवण्याआधीच नाशिकमध्ये तणाव निर्माण होत जमाने पोलिसांवर दगडफेक केली. या दगडफेकीमध्ये २१ पोलिस जखमी झाले तर अनेक वाहनांचे मोठे नुकसान झाले. या हिंसाचार प्रकरणी १४०० ते १५०० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आतापर्यंत ५७ संशयित आरोपी निष्पन्न झाले आहेत. तर २५ जणांना नाशिक पोलिसांनी अटक केली. संशयित आरोपींमध्ये एका विधी संघर्षित बालकाचाही समावेश आहे.

नाशिक हिंसाचार प्रकरणात कारवाई करण्यात आलेल्या संशयित आरोपींमध्ये काँग्रेसचे हनिफ बशीर, ठाकरेंच्या शिवसेनेचे निलोफर शेख, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे अरीफ हाजी पटेल शेखचा देखील समावेश आहे. कट रचणे, अफवा पसरवणे, प्रत्यक्ष - अप्रत्यक्ष हिंसाचार घडविण्यात सहभाग असल्याने या सर्वांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नाशिक पोलिसांवर जमावाने हल्ला करत वाहनांची तोडफोड केली होती. हल्ल्यात २१ पोलिस अधिकारी, कर्मचारी जखमी झाले तर २५ ते ३० वाहनांची तोडफोड झाली.

या हिंसाचार प्रकरणी नाशिक पोलिसांकडून कठोर कारवाई सुरू आहे. जमावाने केलेला हल्ला पूर्वनियोजित असल्याचा पोलिसांचा संशय आहे. जमावाने पोलिसांवर फेकलेले दगड, विटा, टाईल्स तपासणीसाठी फॉरेन्सिक टीमकडे पाठवले आहेत. व्हायरल व्हिडीओ आणि सीसीटीव्हीच्या आधारे नाशिक पोलिसांचा तपास सुरू आहे. पोलिस गुन्हा दाखल केलेल्या सर्व आरोपींचा शोध घेत आहेत. या घटनेनंतर अनेक आरोपी फरार झाले.

नाशिकचे पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी पत्रकार परिषद घेत सांगितले की, 'नाशिक शहरात परवा रात्री जी घटना झाली त्यात कठोर कारवाई सुरू आहे. जागेवर १५ जणांना अटक केली होती. ५४ जणांनाची नावे गुन्ह्यात टाकली आहेत. अधिक नावे येत आहेत त्यांची चौकशी करत आहोत. आम्हाला माहिती होती की माथी भडकवली जात होती. यामध्ये ज्यांचा सहभाग आहे त्यांची नावे मिळाली आहेत. आम्ही तपास करतो की त्यांचा गुन्ह्यात सहभाग आहे आणि त्यानुसार तपास करत आहोत. राजकिय पार्श्वभूमी आम्ही बघत नाही.'



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply