Mumbai Rain : पहिल्या पावसातच मुंबई तुंबली! सायनसह या भागात साचलं पाणी, लोकलवरही परिणाम?

Mumbai Rain Alert: उशीरा का होईना, अखेर पावसाने महाराष्ट्रात हजेरी लावली आहे. मुंबईत शनिवारी सकाळपासूनच ढगाळ वातावरण होतं. दुपारनंतर मुंबईसह उपनगरात पावसाच्या जोरदार सरी बरसल्या. अचानक आलेल्या पावसामुळे चाकरमान्यांची पुरती तारांबळ उडाली. दोन ते तीन तास सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईच्या सखल भागात पाणी साचलं.

मुसळधार पावसाने मुंबईच्या नालेसफाईचे मात्र तीनतेरा वाजवले. सायन सर्कल, अंधेरी सबवे आणि दहिसर वेस्टन एक्सप्रेस हायवेवर मोठ्या प्रमाणात पावसाचं पाणी तुंबल्याचं पाहायला मिळतं आहे. याशिवाय दहिसर वेस्टन एक्सप्रेस हायवेवर सुद्धा पाणी साचलं आहे.

मुंबईत सायन किंग्जसर्कल येथील गांधी मार्केटमध्ये पाणी साचले. हा सखल भाग असल्याने येथे दरवर्षीच्या पावसांत पाणी साचते. यंदाही पहिल्याच पावसांत येथे पावसाचे पाणी साचल्याने येथील व्यापारी, रहिवाशांची धावपळ उडाली. पालिकेने पंप लावल्याने येथील काही वेळातच पाण्याचा निचरा झाला.

पहिल्याच पावसात मुंबईची तुंबई झाल्याने वाहनधारकांना पावसाच्या पाण्यातून वाट काढावी लागली आहे. विशेष बाब म्हणजे मुंबई महापालिकेने पावसाळ्यापूर्वी नालेसफाईसाठी साधारण १५० कोटी रुपये खर्च केले होते. मात्र, असं असून सुद्धा मुंबईतील अनेक भागात पाणी तुंबल्याचं चित्र आहे.

दरम्यान, शनिवारी सकाळीपासून सुरू असलेल्या पावसामुळे रेल्वे आणि रस्ते मार्गावरील वाहतूकीवर परिणाम झाला आहे.मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावरील लोकल सेवा १० ते १५ मिनिटे विलंबाने धावत होत्या. तर पश्चिम रेल्वे मार्गावरील लोकल सेवा १५ ते २० मिनिट पर्यत विलंबाने धावत होत्या. त्यामुळे पहिल्याचा पावसात मुंबईकरांना लेटमार्क लागला आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply