Mumbai-Goa Highway : पहिल्याच पावसात मुंबई-गोवा महामार्गावर दरड कोसळली, गोव्याकडे जाणारी वाहतूक ठप्प

Mumbai-Goa Highway : पहिल्याच पावसामुळे मुंबई-गोवा महामार्गावर (Mumbai-Gao Highway) दरड कोसळल्याची घटना समोर आली आहे. दरड कोसळल्यामुळे मुंबईवरून गोव्याच्या दिशेने जाणारी वाहतूक काही काळासाठी बंद करण्यात आली. महाड तालुक्यातील नांगलवाडी गावच्या हद्दीमध्ये ही घटना घडली. पोलिसांकडून (Raigad Police) स्थानिक नागरिकांच्या मदतीने दरड हटवण्याचे काम सुरू आहे. दरड हटवल्यानंतर या मार्गावरून वाहतूक पोलिसांकडून सुरळीत करण्यात येणार आहे. दरड कोसळण्याची ही घटना या मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशाने आपल्या मोबाईलमध्ये कैद केली आहे. याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे

दुसरीकडे रत्नागिरीत मुंबई -गोवा महामार्गावर संगमेश्वरमधील धामणी येथे महामार्ग खचण्याची भीती निर्माण झाली आहे. संरक्षक भिंतीचे काम अर्धवट स्थितीत राहिल्याने पावसामुळे रस्ता खचण्यास सुरुवात झाली आहे. धामणी येथील रेल्वे ब्रीजच्या जवळ महामार्ग धोकादायक बनला आहे. डिझेल तुटवडा असल्याने काम बंद असल्याचे राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्यांनी माहिती दिली. रस्ता खचल्यास महामार्गावरील वाहतूक बंद होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

Pune Rain Update : पुणे जलमय! पावसामुळे पुणेकर बेहाल, १५ ठिकाणी झाडं कोसळली; रस्त्यांवर मोठी वाहतूक कोंडी

मान्सून महाराष्ट्रामध्ये दाखल झाल्यापासून कोकणामुळे जोरदार पाऊस पडत आहे. रायगड जिल्ह्यातल्या महाड, माणगाव, पोलादपूर, म्हसळा तालुक्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले असून अनेक ठिकाणी रस्त्यांवर पाणी साचले आहे. असह्य उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना या पावसामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. तर, रत्नागिरीत मान्सून सक्रीय झाला आहे. पावसामुळं बळीराजा सुखावला. दुपारनंतर जिल्ह्यात पावसाने दमदार एन्ट्री केली. पुढील चार दिवस रत्नागिरीसाठी आँरेंज अलर्ट हवामान खात्याने जारी केला आहे.

दरम्यान, सिंधुदुर्ग जिल्ह्याला जोरदार पावसाने झोडपून काढले आहे. दुपारपासून जिल्ह्यात सर्वत्र पावसाची संततधार असून अनेक ठिकाणी सकल भागात पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. कुडाळ कॉलेज सर्कल भागात रस्त्यावर पाणी आल्यामुळे वाहनचालक आणि नागरीकांना या पाण्यातून वाट काढावी लागत आहे. सध्या पावसाची संततधार सुरूच असून उद्याही मुसळधार पाऊस पडण्याचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply