Mumbai Crime News : मालाडमध्ये बार डान्सरची हत्या; नको त्या अवस्थेत सापडला मृतदेह, नेमकं प्रकरण काय?

Mumbai Crime : मालाडच्या मालवणी परिसरातील जुन्या चर्चजवळील निर्जन जागेत बुधवारी एका महिलेचा अर्धनग्न अवस्थेतील मृतदेह सापडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. मृतदेह पत्र्याच्या शेडजवळील झुडपात आढळून आला होता. स्थानिकांनी ही माहिती पोलिसांना दिल्यानंतर मालवणी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेहाचा पंचनामा करून तो शवविच्छेदनासाठी पाठवला. सुरुवातीला मृतदेहावर कोणत्याही स्पष्ट जखमेच्या खुणा नसल्याने पोलिसांनी अपमृत्यू म्हणून गुन्हा नोंदवला होता.

दरम्यान, महिलेची ओळख पटविण्यासाठी तिचे छायाचित्र परिसरातील पोलीस ठाण्यांना पाठवण्यात आले होते. गुरुवारी दुपारी तिची ओळख पटली. मृत महिलेचे नाव राणी शुक्ला (४०) असून ती कांदिवलीच्या चारकोप येथे आपल्या आई आणि १३ वर्षांच्या मुलीसह राहत होती. ती पतीपासून विभक्त झाली होती आणि पूर्वी बारबाला म्हणून काम करत होती. सध्या तिच्या कुटुंबीयांकडून आणि परिचितांकडून पोलिस माहिती गोळा करत आहेत.

शवविच्छेदन अहवालातून मात्र धक्कादायक बाब समोर आली. राणी शुक्लाची गळा दाबून हत्या करण्यात आल्याचे अहवालात स्पष्ट झाले. त्यानंतर पोलिसांनी लगेचच खुनाचा गुन्हा दाखल केला. पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, महिलेची हत्या करून तिला अर्धनग्न करुन मृतदेह चर्च परिसरात टाकण्यात आला असण्याची शक्यता आहे.

पोलीस सीसीटीव्ही फुटेज तपासत असून आरोपी याच भागातील असण्याचा देखील अंदाज आहे. या घटनेमुळे स्थानिक नागरिकांत भीतीचे वातावरण असून आरोपीला शक्य तितक्या लवकर अटक केली जाईल, असे मालवणी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेंद्र नगरकर यांनी सांगितले.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *