Mumbai Rains : अंधेरीत उघड्या नाल्यात पडून ४५ वर्षीय महिलेचा मृत्यू

Mumbai Rains Lady Dies After Falling Into Open Drain in Andheri : मुसळधार पावसाने बुधवारी (२५ सप्टेंबर) महामुंबईला झोडपून काढलं. दिवसभर शहरांतील अनेक भाग आणि उपनगरांत कोसळणाऱ्या पावसात तग धरून असलेली मुंबई सायंकाळी मात्र पुरती कोलमडून गेली. सायंकाळी शहरातील अनेक भागांत २०० मिमीपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली. पूर्व उपनगरांतील रेल्वे स्थानकांवर साचलेल्या पाण्यामुळे मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. सखल भागांत साचलेल्या पाण्यामुळे रस्ते वाहतूकही विस्कळीत झाली होती. रात्री उशीरापर्यंत गाड्या बंद असल्यामुळे प्रवाशांना रेल्वे स्थानकांवरच मुक्काम करावा लागला. अशातच पावसामुळे एक दुर्दैवी घटना घडली आहे. अंधेरी भागात एका महिलेचा नाल्यात पडून मृत्यू झाला आहे.

अंधेरीच्या एमआयडीसी भागात एका ४५ वर्षीय महिलेचा उघड्या नाल्यात पडून मृत्यू झाला आहे. या भागात पाणी साचलं होतं. त्यामुळे नाला व रस्ता दिसत नव्हता. तसेच नाल्यावर झाकणही नव्हतं. त्यामुळे ही महिला नाल्यात पडली व काही अंतरावर वाहून गेली. नाल्यातील पाण्यात बुडून तिचा मृत्यू झाला. दरम्यान, नाल्यावर झाकण का नव्हतं? असा प्रश्न संतप्त नागरिकांनी उपस्थित केला आहे आणि मुंबई महापालिकेला धारेवर धरलं आहे. मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की अंधेरी येथील एमआयडीसी भागात विमल गायकवाड ही ४५ वर्षीय महिला उघड्या नाल्यात बुडाली. अग्निशमन दलाने महिलेला नाल्यातून बाहेर काढलं व कूपर रुग्णालयात नेलं. मात्र, रुग्णालयातील डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं.

Solapur : अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आरोपीस २० वर्षे सक्तमजुरी


महिलेला नाल्यातून काढण्यासाठी अग्निशमन दलाला पाचारण करावं लागलं
अंधेरी पूर्व परिसरातील वेरावली जलशयाजवळ ही दुर्घटना घडली. अंधेरी एमआयडीसी येथील सीप्झ प्रवेशद्वार क्रमांक ८ येथील जलशय इमारतीच्या जवळील नाल्यात ही महिला वाहून गेली होती. रात्री ९.१५ च्या सुमारास ही घटना घडली. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने नाल्यामध्ये महिलेचा शोध घेण्यास सुरुवात केली. कोसळणारा मुसळधार पाऊस आणि अंधारामुळे शोध मोहिमेत अडचणी येत होत्या.अग्निशमन दलाच्या जवानांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करीत महिलेचा शोध घेतला. तिला नाल्यातून बाहेर काढून कुपर रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.

मुंबईत मुसळधार पाऊस
बुधवारी संध्याकाळपासून पडणाऱ्या पावसाने रात्री ८ नंतर चांगलाच जोर धरला होता. सकाळी ८ ते रात्री ११ वाजेपर्यंतच्या आकडेवारीनुसार शहर भागात ९६ मिमी पावसाची नोंद झाली. तर पश्चिम उपनगरात १०४ मिमी पावसाची नोंद झाली. सर्वाधिक १६९ मिमी पाऊस पूर्व उपनगरात पडला. पश्चिम उपनगरात सर्वाधिक पाऊस अंधेरी परिसरात पडला. मरोळ, मालपा डोंगरी, दिंडोशी या भागात १५० मिमीहून अधिक पाऊस पडला.
मुंबईकर खोळंबले
मुंबईत बुधवारी सकाळपासून पावसाची संततधार सुरू होती. दुपारनंतर वारा आणि पावसाचा जोर वाढला. संध्याकाळच्या पावसामुळे शहरातील सखल भागांत पाणी साचलं. यामुळे रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली. विद्याविहार आणि कांजूरमार्ग दरम्यान रेल्वे रुळांवर पाणी साचल्याने अनेक लोकल व हजारो प्रवासी अडकून पडले. तर अनेकांनी पावसात भिजत, गर्दीतून वाट काढत, रेल्वे स्थानकं व बस स्टॉप गाठले. परंतु, पावसामुळे ही वाहतूक ठप्प होती. त्यानंतर अनेकांनी चालत घराची वाट धरली.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply