MI : वानखेडेवर मुंबईचे प्रेक्षक विरुद्ध हार्दिक ? सलग दोन पराभवांमुळे मुंबई इंडियन्स संघाचीही प्रतिष्ठा पणास

Mumbai: सलग दोन पराभव, तसेच अजूनही गुणफलकात नावासमोर भोपळा असे हेलकावे खात असलेल्या मुंबई इंडियन्सचे अस्तित्व उद्या घरच्या मैदानावरच पणास लागणार आहे. एकीकडे हे आव्हान असताना आणि दुसरीकडे हार्दिक पंड्याविरुद्ध मुंबईकर प्रेक्षक हा सामना तेवढाच चर्चेचा विषय ठरणार आहे.

यंदाच्या आयपीएल स्पर्धेत मुंबईचा संघ उद्या वानखेडेवर म्हणजेच आपल्या घरच्या मैदानावर पहिला सामना राजस्थान रॉयल्सविरुद्ध खेळणार आहे. स्पर्धेत नवी उभारी घेण्यासाठी मुंबईला विजय आवश्यकच आहे. सर्व खेळाडूंचा कस पणास लागेलच, पण कर्णधार हार्दिक पंड्यासाठी अस्तित्व पणास लागणारी परिस्थिती आहे.

खेळाडू म्हणून कामगिरी उंचावणे, कर्णधार म्हणून संघाला पहिला विजय मिळवून देणे यापेक्षा स्टेडियममधून होणाऱ्या विरोधाचा सामना करणे हे हार्दिकसाठी सर्वात आव्हानात्मक असू शकेल.

Sambhajinagar Corporation : छत्रपती संभाजीनगर मनपाची 182 कोटीची विक्रमी कर वसुली

रोहित शर्माला बाजूला करून हार्दिकला मिळालेले मुंबई इंडियन्स संघाचे कर्णधारपद मुंबई संघाच्या पाठीराख्यांना पटलेले नाही. गुजरात संघातून दूर झाल्यामुळे गुजरात संघाचे पाठीराखे दुखावले आहेत. त्यामुळे अहमदाबादमध्ये झालेल्या पहिल्या सामन्यात हार्दिकला दोन्हीकडच्या पाठीराख्यांच्या रोषाचा सामना करावा लागला होता. हैदराबादमध्ये झालेल्या सामन्यातही तेथील प्रेक्षक रोहित...रोहित...असा नारा देत होते.

मुंबई संघटनेचे स्पष्टीकरण

मुंबईत उद्या होणाऱ्या सामन्यात हार्दिकला मोठ्या प्रमाणात विरोध होऊ शकतो. याची कल्पना मुंबई इंडियन्स संघालाही आहे. हार्दिकला विरोध करणाऱ्या घोषणा दिल्या किंवा शेरेबाजी केली तर त्यांना पकडण्यात येईल आणि त्यासाठी स्टेडियममध्ये अतिरित्त पोलिस तैनात करण्यात येतील, असे वृत्त प्रसिद्ध झाले होते; परंतु ही अफवा आहे.

यावर कोणी विश्वास ठेऊ नये, असे मुंबई क्रिकेट संघटनेने स्पष्ट केले. आयसीसीच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसारच सुरक्षा असेल, असे सांगण्यात आले. त्यामुळे सामना एका बाजूला आणि हार्दिकला होत असलेला विरोध दुसऱ्या बाजूला असे चित्र उद्या वानखेडेवर असण्याची शक्यता आहे.

गोलंदाजीत बदल आवश्यक

मुंबई इंडियन्स संघात खरे तर नावाजलेले गोलंदाज आहेत; परंतु बुमराचा अपवाद वगळता इतर सर्वांनी साफ निराशा केली आहे. हैदराबादविरुद्धच्या सामन्यात १८ वर्षीय दक्षिण आफ्रिकेचा युवक गोलंदाज क्वेना एमफाका याला संधी देण्यात आली, पण त्याची भलतीच धुलाई झाली होती. मात्र गत स्पर्धेत बुमरा नसतानाही धुरा सांभाळणाऱ्या आकाश मधवाल याचा विचार करण्यात आलेला नाही. हैदराबादविरुद्ध २७७ धावांची लूट झाल्यानंतर उद्या गोलंदाजीत बदल अपेक्षित आहेत.

दुसऱ्या बाजूला राजस्थान संघाने दोनही सामने जिंकलेले असल्यामुळे ते विजयाच्या हॅट्ट्रिकसाठी प्रयत्नशील असणारच. यशस्वी जयस्वाल घरच्या मैदानावर खेळणार आहे, तर रियान परागचा वेगळा अवतार सध्या पाहायला मिळत आहे. त्यामुळे मुंबईच्या गोलंदाजांना सावधच रहावे लागणार आहे.

बुमराद्वारे आक्रमण?

इतर संघांविरुद्ध अडखळणाऱ्या, परंतु मुंबईविरुद्ध २७७ धावांची विक्रमी धावसंख्या उभारणाऱ्या हैदराबाद संघाने कागदावर बलवान असलेल्या मुंबई गोलंदाजीच्या मर्यादा स्पष्ट केल्या. यात ज्याची क्रिकेट विश्वात धास्ती घेतली जाते त्या जसप्रित बुमराचे अस्त्र आपल्या भात्यात असताना त्याचा वापरच योग्य वेळी न करण्याच्या कर्णधार म्हणून हार्दिकच्या डावपेचांवर जोरदार टीका करण्यात आली आहे. हैदराबादविरुद्धच्या सामन्यात पहिल्या १३ षटकांत बुमराला केवळ एकच षटक देण्यात आले होते. त्यामुळे उद्याच्या सामन्यात कोणत्याही परिस्थितीत बुमराद्वारे आक्रमण सुरू केले जाण्याची शक्यता आहे.

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply