Mumbai : “सरकारने टोलमाफीचा निर्णय घेतला त्याबद्दल आभार, पण…”; राज ठाकरेंचा थेट इशारा!

Mumbai : मुंबईच्या प्रवेशद्वारांवर असलेल्या पाचही टोल नाक्यांवर हलक्या वाहनांना संपूर्ण टोलमाफी देण्याचा निर्णय सोमवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. सरकारच्या या निर्णयानंतर आता विविध राजकीय चर्चांनाही उधाण आलं आहे. दरम्यान, या मुद्द्यावर आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही भाष्य केलं असून त्यांनी सरकारचे आभार मानले आहेत. तसेच निवडणुकीनंतर परत टोल सुरु करण्याचा प्रयत्न झाल्यास आम्ही ते होऊ देणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. आज झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली.

नेमकं काय म्हणाले राज ठाकरे?

“टोलमाफी करा ही आमचीच मागणी होती. त्यासाठी आमच्या महाराष्ट्र सैनिकांनी प्रयत्न केले. अनेक आंदोलनं केली. टोलद्वारे लोकांची फसवणूक होते, हे आम्हीच पहिल्यांदा लोकांपुढे मांडलं. आता मुंबईतील पाचही टोल बंद झाले आहेत. त्यासाठी मी सरकारचे आभार मानतो, अशी प्रतिक्रिया राज ठाकरे यांनी दिली. तसेच निवडणुकीच्या तोडांवर टोल बंद करायचे आणि निवडणूक झाल्यावर परत सुरु करायचे, असं होऊन चालणार नाही. कारण यापूर्वी अनेकदा असं झालं आहे. आम्ही टोलनाके बंद करतो असं सांगितलं गेलं, पण पुन्हा ते सुरु केले गेले. त्यामुळे आम्ही पुन्हा हे टोल सुरु होऊ देणार नाही”, असा इशाराही राज ठाकरे यांनी दिला.

 

पुढे बोलताना, “टोलचे किती पैसे येतात आणि कुठं जातात हे कळायला मार्ग नाही. कारण आजपर्यंत हा सगळा व्यवहार कॅशमध्ये होत होता. किती गाड्या गेल्या, कुणाला किती पैसे मिळाले, कुणाच्या खिशात किती पैसे गेले, यावर सर्वच राजकीय पक्ष गप्प बसले होते. आता टोलमाफीचं श्रेय घेण्यासाठी अनेक जण पुढे येतील. पण त्याचा काहीही संबंध नाही. टोलचे आंदोलन कुणी केलं हे सर्वांना माहिती आहे”, असेही ते म्हणाले.

लाडकी बहीण योजनेबाबत म्हणाले…

लाडकी बहीण योजनेबाबत विचारलं असता, “मी मागे माझ्या सभेत बोललो होतो. अशाप्रकारे लोकांना मोफत पैसे वाटणं योग्य नाही. सरकार असं करू शकत नाही. हे पैसे राजकीय नेत्यांच्या घरचे नाही. हे सरकारचे पैसे आहेत. सरकारकडे तिजोरीत पैसे नाही. लाडकी बहीण योजनेचा आता जो हफ्ता मिळाला आहे, तो शेवटचा हफ्ता असेल. यापुढे सरकार पैसे वाटू शकत नाही. कारण सरकारकडे पैसेच नाही. अशाने राज्य कंगाल होईल”, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply