मोसमी पाऊस केरळमध्येच; राज्यात आगामी दोन-तीन दिवस पूर्वमोसमी पावसाचा अंदाज

सर्वसाधारण वेळेपेक्षा तीन दिवस आधीच २९ मे रोजी केरळमार्गे भारतात दाखल झालेला मोसमी पाऊस रविवारीही केरळमध्येच होता. मोसमी वाऱ्यांची आगेकूच आज होऊ शकली नाही. मात्र, पुढील तीन-चार दिवसांमध्ये पोषक वातावरणामुळे त्यांची भारतात आणखी काही भागांत प्रगती होईल, अशी शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाकडून व्यक्त करण्यात आली आहे. दरम्यान, राज्याच्या दक्षिण भागात पुढील दोन-तीन दिवस पूर्वमोसमी पावसाच्या सरी कोसळण्याचा अंदाज आहे.

अंदमानातील प्रवेशापासून बहुतांशवेळा दिवसाआड प्रगती करणारा मोसमी पाऊस २० मे रोजी दक्षिण अरबी समुद्रात पोहोचला होता. त्यानंतर नऊ दिवसांनी त्याने केरळमधून भारतात प्रवेश केला. त्यामुळे आता त्याच्या महाराष्ट्रातील प्रवेशाचे वेध लागले आहेत. मोसमी वाऱ्यांच्या पुढील प्रवासासाठी अद्यापही पोषक वातावरण कायम आहे. त्यामुळे पुढील तीन-चार दिवसांच्या कालावधीत मोसमी पाऊस संपूर्ण केरळ व्यापणार आहे. मध्य अरबी समुद्रातही तो प्रगती करून तमिळनाडू आणि कर्नाटकच्या काही भागांत प्रगती करणार असल्याचे हवामान विभागाकडून जाहीर करण्यात आले आहे. मोसमी पावसाच्या बंगालच्या उपसागरातील शाखेने मात्र गेल्या दहा दिवसांपासून कोणतीही प्रगती केलेली नाही. मात्र, या विभागातही तीन-चार दिवसांत प्रगती होईल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

मोसमी पाऊस दाखल झाल्यामुळे सध्या केरळमध्ये जोरदार पाऊस होत आहे. पुढील पाच दिवस केरळसह कर्नाटक, तमिळनाडूच्या काही भागामध्ये पाऊस होणार आहे. किनारपट्टीच्या भागामध्ये ताशी ४० ते ६० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

महाराष्ट्रात पाऊस कुठे? –

राज्यात प्रामुख्याने दक्षिण भागात पुढील दोन-तीन दिवस पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मध्य-पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, मराठवाड्यातील परभणी, बीड, हिंगोली, लातूर, उस्मानाबाद आदी जिल्ह्यांत पावसाची शक्यता आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply