पुणे : महाविद्यालयांच्या परिसरात गांजाची विक्री करणारे जेरबंद ; सिंहगड रस्ता, कात्रज परिसरात पोलिसांची कारवाई

पुणे : गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने शहरातील भारती विद्यापीठ आणि सिंहगड रोड परिसरात छापा टाकून तिघा गांजा तस्करांना अटक केली. त्यांच्याकडून साडेचार लाख रुपये किंमतीचा २३ किलो गांजा, दोन कोयते, मोबाइल, रोकड आणि इलेक्ट्रीक वजन काटा जप्त करण्यात आला आहे. प्रामुख्याने महाविद्यालयांच्या परिसरात त्यांच्याकडून गांजाची विक्री केली जात होती. वसतिगृहांत राहणारे काही विद्यार्थी त्यांचे ग्राहक असल्याचे पोलीस तपासात स्पष्ट झाले आहे.
अमित उर्फ बॉब प्रभाकर कुमावत (वय ३२, रा. समर्थनगर हिंगणे), सनी विजय भोसले (वय २४), साई गिता कोताकोंडा (वय १९,रा. दोघे रा. जाधवनगर वडगाव बुद्रुक, सिंहगड रोड) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी तिघांच्या विरुद्ध भारती विद्यापीठ आणि सिंहगड रोड पोलिस ठाण्यात अमली पदार्थ विरोधी कायद्यानुसार दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तिघे आरोपी मुळचे अहमदनगर जिल्ह्यातील आहेत. ते एकमेकांच्या परिचयाचे आहेत. शहरातील कात्रज, सिंहगड रस्ता परिसातील नामांकित महाविद्यालयांच्या परिसरात ते गांजाची विक्री करत होते.
वरिष्ठ पोलिस निरीक्षक विनायक गायकवाड हे भारती विद्यापीठ पोलिस ठाण्याच्या हद्दीत गस्तीवर असताना पोलिस कर्मचारी विशाल शिंदे यांना अमित उर्फ बॉब हा त्याच्या राहत्या घरातून गांजाची विक्री करत असल्याची माहिती मिळली. त्यानुसार पथकाने छापा टाकला असता, बॉब याच्या घरात ४ लाख २३ हजार रुपये किंमतीचा २१ किलो गांजा सापडला. दुसरी कारवाई सिंहगड रस्ता येथील जाधवनगर परिसरात करण्यात आली आहे. तेथील सिद्धेश्वर हॉटेल समोरील रस्त्यावर सनी आणि साई हे दोघे संशयास्पदरित्या हालचाल करत असाताना गस्तीवरील पथकाला दिसले. दोघांना ताब्यात घेऊन त्यांची झडती घेतली त्यावेळी त्यांच्याकडे ३१ हजार रुपये किंमतीचा गांजा, दोन मोबाइल, रोकड आणि कोयते सापडले.. दोघांच्या विरुद्ध सिंहगड रोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे, सहायक पोलिस आयुक्त गजानन टोम्पे, पोलिस निरीक्षक विनायक गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचारी विशाल शिंदे, विशाल दळवी, मारुती पारधी, नितेश जाधव, योगेश मोहिते यांच्या पथकाने ही कारवाई केली.

 



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply